
या पवित्र भूमीला वंदन करुन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते. शिवजयंती हा केवळ उत्सव नाही, तर स्वराज्य, स्वाभिमान आणि सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे. स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या समस्त मावळ्यांना या दिवशी वंदन करते. सुनेत्रा पवार या शिवनेरी किल्ल्यावरुन बोलत होत्या.

यापूर्वी अनेकवेळा छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेबांना वंदन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभल होतं. आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारा आहे असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री बनल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं हे पहिलं भाषण आहे.

नुकतीच मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ज्या कठिण प्रसंगात मी शपथ घेतली, तेव्हा माझ्या डोळ्यासामोर जिजाऊ माँ साहेब होत्या. हे शब्द उच्चारत असताना सुनेत्रा पवार भावनिक झाल्या होत्या. जिजाऊ माँ साहेबानी केवळ छत्रपती शिवरायांना जन्म दिला नाही, तर स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिला. दोन हात करण्याची जिद्द दिली, तिचं तुमची, आमची प्रेरणा, आधार आहे असं सुनेत्रा पवार आपल्या भाषणात म्हणाल्या.

या जन्मभूमीत इथे उभं राहून बोलताना खरंतर माझ्या अंगावर काटा आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना दिलेली शपथ आठवली. आपण सगळे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तो शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचारांचा वारसा मी कधी ही सोडणार नाही. हा शब्द मी शिवजयंतीच्या साक्षीने देते असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.