
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओकने सध्या 'नॅशनल क्रश' म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. निळ्या साडीतील तिची एक मुलाखत काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली आणि तिचा साधेपणा चाहत्यांना आणखी आवडला. पण या ग्लॅमरस अभिनेत्रीलाही एका गोष्टीचा ट्रॉमा आहे, जो तिने नुकत्याच एका मुलाखतीत उघड केला.

ट्रॉमा म्हणजे एखाद्या धक्कादायक किंवा तणावपूर्ण घटनेचा मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होणारा दीर्घकाळचा नकारात्मक परिणाम. गिरीजा ओकने 'इसापनिती'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या 'दोन स्पेशल' या नाटकाच्या एका प्रयोगातील अनुभव सांगितला, ज्यामुळे तिला एका खास गाण्याचा ट्रॉमा निर्माण झाला.

गिरीजा सांगते की, "नाटक सुरू असताना प्रेक्षक बोलतात, चिप्सच्या पाकिटांचा खरखराट येतो किंवा फोनच्या रिंगटोन वाजतात. 'दोन स्पेशल'मध्ये एक अतिशय संवेदनशील सीन आहे, ज्यात मी माझ्या बहिणीवर झालेल्या अत्याचारामुळे तिने आत्महत्या केल्याचे सांगते. त्या सीनेमध्ये माझे संवाद असतात – 'धनुने असं करून घेतलं...' आणि मग मी थोडा वेळ थांबते, कारण मला खूप रडू येते."

पुढे ती म्हणाली, "एकदा असाच प्रयोग चालू असताना समोरच्या दुसऱ्या रांगेत एका प्रेक्षकाचा फोन वाजला. त्याची रिंगटोन होती – 'हृदयी वसंत फुलताना'! त्या क्षणी मी भावना दाबून ठेवल्या होत्या. रडता कामा नये, कमकुवत दिसता कामा नये असा प्रयत्न करत होते. पण ती रिंगटोन ऐकून मी पूर्णपणे बावरून गेले. तेव्हापासून हे गाणं ऐकले की माझे हृदय धडधडायला लागते. कुठेही हे गाणं ऐकू आले तरी ट्रॉमा जागा होतो आणि मी ते ऐकायचे टाळते."

हे प्रसिद्ध 'हृदयी वसंत फुलताना' गाणं १९८८ साली आलेल्या सुपरहिट मराठी चित्रपट 'अशी ही बनवाबनवी'मधील आहे. सचिन पिळगांवकर दिग्दर्शित या चित्रपटातील हे सहाबहार रोमँटिक गाणं शांताराम नांदगावकर यांनी लिहिले असून सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंह, सचिन पिळगांवकर आणि अपर्णा मयेकर यांच्या आवाजात ते गायले गेले आहे.