
संपलेल्या वर्षात सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंनी दमदार कामगिरी केली. साधारण वर्षभरापूर्वी या धातूमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना 70 टक्क्यांपेक्षाही अधिक रिटर्न्स मिळाले. त्यामुळेच आता नव्या वर्षात नेमका कोणता धातू कमाल करणार? असा सवाल केला जातोय. यावेळी सोने, चांदी यासोबतच कॉपरचीही तेवढीच चर्चा होत आहे.

2026 साली चांदीला चांगलेच महत्त्व येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षात चांदीचा भाव रॉकेटप्रमाणेच वाढला होता. त्यामुळे या वर्षीदेखील हा भाव असाच वाढण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे. केडिया कॅपिटलचे संस्थापक अजय केडिया यांच्या मतानुसार एखाद्या असेटची किंमत खूप वाढली तर कालांतराने त्याची किंमत घसरते. परंतु दीर्घावधीसाठी गुंतवणूक करण्यासाठी चांदी हा धातू उत्तम पर्याय ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.

या वर्षातदेखील सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोन्याकडे बचत आणि सुरक्षा म्हणून पाहिले जाते. तर कॉपर आणि चांदी या धातूंचा उपयोग उद्योग जगतात होतो. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर सोने हा अजूनही चांगला पर्याय आहे.

सोबतच तुम्ही सोन्यात दीर्घावधीसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो, असेही सांगितले जात आहे. 2025 या सालाच्या शेवटी कॉपर हा धातू चर्चेत आला. आता ग्रीन एनर्जी, इलेक्ट्रिक कार, चार्जिंग स्टेशन, रिन्यूएबल एनर्जी, पायाभूत सविधांच्या निर्मितीसाठी हा धातू वापरला जात आहे. त्यामुळेच भविष्यात कॉपर या धातूची किंमतही वाढण्याची शक्यता आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)