
सध्या मराठवाड्यात पावसाने थैमान घातले आहे. लोकांच्या शेतात चार-चार फूट पाणी साचले आहेत. मका, कापूस, तूर यासारखी पिके मुसळधार पावसामुळे वाहून गेली आहेत. पावसाच्या या रौद्र रुपाचा हजारो शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

दरम्यान, एकीकडे मराठवाड्यात पावसाने हाहा:कार माजवलेला असताना आता हवामान विभागाने पावसाचा नवा अंदाज सांगितला आहे. या अंदाजानुसार महाराष्ट्रात पाऊस बरसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील संकट अजूनही संपले नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यात मेघ गर्जनेसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य काळजी घ्यावी तसेच शहरी भागात काम करणाऱ्यांनीही कामाला जाताना योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. पवसाचा हा प्रभाव पुढे 2 ते 3 ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक अक्षरश: वाहून गेले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची लवकरात लवकर मदत करावी आणि शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी केली जात आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे सरकारने सांगितले आहे.