
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जातंय. आज दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना रंगणार आहे. कांदिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टीव्ही फोडले आहेत.

कार्यकर्त्यांनी टीव्ही फोडत निषेध नोंदवला आहे. काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली होती. त्यानंतर आता ठिकठिकाणी ठाकरेंच्या सेनेकडून आंदोलन केलं जातंय. हातामध्ये बॅट घेऊन टीव्हीची स्क्रीन फोडण्यात आली आहे.

पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा भरल्या नसताना आणि शहीद जवानांचे रक्त सुकलेले नसताना पाकिस्तानशी क्रिकेट सामने कसे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी केला. भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तानची आज होणारा सामना रद्द करण्याची मागणी ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.

रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, असं मोदी म्हणाले होते. त्यामुळे आता पाकिस्तान बरोबर होणाऱ्या क्रिकेट सामन्यावर बहिष्कार घालावा, असं ठाकरे यांनी म्हटलंय. या सामन्याला शिवसेनेचा विरोध असून 'माझं कुंकू, माझा देश' हे आंदोलन आज केलं जात आहे.

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी महिला आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूरचा डब्बा भेट देण्यात येणार आहे. या आंदोलनात अंबादास दानवे देखील सहभागी झाले आहेत.