
मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता. आज मुंबईच्या विशेष न्यायालयात या खटल्याचा निकाल लागणार आहे. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली आहे. जवळपास १७ वर्षे चाललेल्या या खटल्यातील आरोपींची न्यायालय सुटका करणार की त्यांना शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एकूण 8 आरोपींवर खटला चालवण्यात येत आहे. या सर्वांवर दहशतवादी कट रचणे, हत्या आणि स्फोटकांचा वापर केल्याचे आरोप आहेत. यात अभिनव भारत या हिंदू कट्टरपंथी संघटनेचा सहभाग होता.

प्रज्ञा सिंग ठाकूर : साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आरोप आहे. या स्फोटासाठी वापरलेली मोटारसायकल त्यांच्या नावावर होती. बॉम्बस्फोटाच्या कटात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सध्या त्या जामीनावर बाहेर असून त्या भाजपच्या खासदार होत्या.

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित : लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बॉम्बसाठी आरडीएक्स (RDX) मिळवून ते बॉम्ब बनवण्यासाठी पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सद्यस्थितीत तेही जामीनावर बाहेर आहेत.

निवृत्त मेजर रमेश उपाध्याय : निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हे अभिनव भारत या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटात सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

सुधाकर द्विवेदी : तसेच सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटासाठी धार्मिक विचारधारेच्या माध्यमातून लोकांना भडकवण्याचे आणि मानसिक पाठिंबा देण्याचे काम त्यांनी केले, असा आरोप होता.

सुधाकर चतुर्वेदी : सुधाकर चतुर्वेदी यांचा बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये सहभाग होता. तसेच चतुर्वेदी यांच्याच घरी बॉम्ब बनवल्याचा आरोपही केला जातो.

समीर कुलकर्णी : तसेच या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी समीर कुलकर्णी बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या स्फोटक रसायनांची व्यवस्था केली, असा आरोप त्यांच्यावर आहे.

अजय राहिरकर : अजय राहिरकर हे अभिनव भारत संघटनेचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांनी बॉम्बस्फोटाच्या कटासाठी आर्थिक मदत गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे हे या प्रकरणातील दोन फरार आरोपी आहेत. बॉम्बस्फोटात प्रत्यक्ष सहभाग घेण्यापासून ते बॉम्ब ठेवण्यापर्यंतचे आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी अनेक वर्षे सुनावणी चालली असून आज न्यायालय या प्रकरणाचा निकाल देणार आहेत.