
भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे आर अश्विनने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. झॅक क्राऊलेला बाद करत इतिहासात आपल्या विक्रमाची सुवर्ण अक्षराने नोंद केली आहे. कसोटीत 500 विकेट घेणारा दुसरा भारतीय फिरकीपटू ठरला आहे.

आर अश्विनने 100 हून कमी कसोटी सामने खेळत 500 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या आधी 8 गोलंदाजांनी 500 हून अधिक गडी बाद करण्याचा विक्रम नोंदवला आहे.

आर अश्विनने 98 व्या कसोटी सामन्यात 500 वा बळी बाद केला. सर्वात वेगाने 500 गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ही कामगिरी 87 व्या कसोटी सामन्यात केली होती. अनिल कुंबळेने 105, ग्लेन मॅक्ग्राने 110, शेन वॉर्नने 108 कसोटीत 500 बळी घेतले.

कसोटीत 500 हून अधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत फिरकीपटूंचं वर्चस्व दिसून येत आहे. अशी कामगिरी करणाऱ्या 9 पैकी 5 फिरकीपटूंचा समावेश आहे.

आर अश्विनने नोव्हेंबर 2011 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून तो भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. कसोटीत त्याने 24 पेक्षा कमी सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत.

आर. अश्विनने 34 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स आणि आठ वेळा एका सामन्यात दहा किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.