
आयपीएल स्पर्धा सुरु होणार असल्याने क्रिकेटप्रेमींना दोन महिने मेजवानी मिळणार आहे. 22 मार्चपासून स्पर्धेचा थरार सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच टी20 वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे.

टी20 वर्ल्डकप जूनमध्ये असून त्यासाठी टीम इंडियाची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. या स्पर्धेत मोहम्मद खेळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर शमीच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून आता सावरत आहे.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितलं की, या वर्षी सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेद्वारे शमी संघात पुनरागमन करू शकतो. याचा अर्थ असा की शमी जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक खेळणार नाही.

जय शाह म्हणाले की, शमीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तो लंडनहून भारतात परतला आहे. बांगलादेशविरुद्धच्या मायदेशातील मालिकेने शमीचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरमध्ये भारत बांगलादेशशी दोन कसोटी आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. मोहम्मद शमीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्याने 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या होत्या.

केएल राहुलबाबत माहिती देताना जय शाह यांनी सांगितलं की, केएल राहुल सध्या एनसीएमध्ये आहे आणि रिकव्हर होत आहे. याचाच अर्थ राहुल आगामी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.