थंड पेय पिताय, सावधान! मुंबईजवळील शहरात शितपेयाच्या बाटलीत सापडल्या काचा अन्…
अंबरनाथमधील एका स्थानिक शीतपेय कारखान्यात अस्वच्छता आणि बाटल्यांमध्ये काच, कचरा आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनसे नेत्यांनी कारखान्यावर छापा टाकला आणि कारवाईची मागणी केली.

मुंबईजवळील शहरात शितपेयाच्या बाटलीत सापडल्या काचा अन्...
- सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी थंड पेय प्यायली जातात. जर तुम्हीदेखील उन्हाच्या त्रासामुळे शितपेय पित असाल तर सावधान, कारण अंबरनाथमध्ये एका लोकल शितपेयाच्या बाटलीत काचा आणि कचरा आढळल्याने खळबळ उडाली आहे.
- मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी पालिका अधिकाऱ्यांना सोबत घेत थेट या कारखान्यावर धडक दिली. हे शीतपेय एखाद्या लहान मुलानं प्यायलं तर काय अनर्थ होईल? असा सवाल करत या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
- बदलापूरच्या एका रिक्षाचालक असलेल्या मनसे कार्यकर्त्याने हे शीतपेय एका हातगाडीवर पिण्यासाठी घेतले. त्यावेळी त्याला यात काच आढळून आली. त्यामुळे त्याने शैलेश शिर्के यांना माहिती दिली.
- त्यांनी मनसे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांच्या मदतीने या शितपेयाचा कारखाना शोधून काढला. अंबरनाथ पश्चिमेच्या उलन चाळ भागातील एका गाळ्यात हा कारखाना सुरू होता.
- तिथं अस्वच्छता, जुने लेबल असलेल्या, उत्पादन केल्याची तारीखही नसलेल्या शितपेयाच्या अनेक बाटल्या सापडल्या.
- इतकंच नव्हे, तर करखान्यातल्या काही बाटल्यांमध्येही काचा आणि कचरा आढळून आला.
- त्यामुळे जर हे शीतपेयं एखादा लहान मुलगा प्यायला, तर काय अनर्थ होईल? असा सवालही त्यांनी केला आहे.
- या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी शैलेश शिर्के यांनी केली. तसेच या कारखान्यात अस्वच्छता असल्याचं मान्य करत शितपेयांचे नमुने अन्न औषध प्रशासनाला पाठवत असल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे स्वच्छता निरीक्षक विनीत पाटोळे यांनी दिली आहे.








