
आपण एखाद्या बार, रेस्टॉरंट किंवा अगदी पार्टीला गेला आणि तिथे दारु ऑर्डर केली तर तुम्हाला ती काचेच्या ग्लासात आणून दिली जाते. तसेच अनेक मद्यप्रेमी हे दारु पिताना नेहमी काचेच्या ग्लासाचा वापर करतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की दारु ही नेहमी काचेच्या ग्लासातच का दिली जाते. आज आपण यामागे दडलेले उत्तर जाणून घेणार आहोत.

काचेच्या ग्लासात दारु पिणं ही केवळ जुनी परंपरा नाही की यामागे काही ठोस कारणं आहेत. अनेक जणांना वाटतं की दारु पिताना केवळ दिखावा म्हणून काचेचा ग्लास वापरला जातो. पण तज्ज्ञांच्या मते यामागे केवळ सौंदर्यच नाही. तर विज्ञान, स्वच्छता आणि दारुचा खरा स्वाद अनुभवण्याचं रहस्य दडलेलं आहे.

वाईन ही लाल रंगाची असते. तर व्हिस्कीचा रंग हा सोनेरी असतो. हा रंग काचेच्या ग्लासात स्पष्ट दिसतो. दारूचा रंग हा तिची गुणवत्तेचा आणि निर्मिती प्रक्रियेचा आरसा असतो. काचेमुळे दारूचा मूळ रंग अगदी स्पष्टपणे दिसतो. केवळ रंगच नाही, तर त्याचा गंध हा दारूच्या चवीचा आत्मा असतो.

वेगवेगळ्या दारूंसाठी खास आकाराचे ग्लास असतात. वाईनसाठी रुंद तोंड असलेला ग्लास वापरला जातो, ज्यामुळे त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो. तर व्हिस्कीसाठी जाड ग्लास वापरले जातात, जे सुगंधाला ग्लासातच साठवून ठेवतात. या आकारांमुळे दारूचा सुगंध नाकापर्यंत पोहोचणे शक्य होते. तसेच पिणाऱ्याला त्या दारुचा खरा आणि पूर्ण स्वाद अनुभवता येतो. यालाच दारुचा आस्वाद घेणं म्हणतात.

दारु प्लास्टिक किंवा धातूच्या भांड्यात न देण्यामागेही एक महत्त्वाचं कारण आहे. काच हा गैर छिद्रयुक्त पदार्थ असतो. काचेच्या पृष्ठभागावर कोणतेही सूक्ष्म छिद्र नसतात. ज्यामुळे जिवाणू किंवा त्याचा वास लपून राहत नाही. तसेच ते ग्लास सहज आणि पूर्णपणे स्वच्छ करता येतात.

प्लास्टिक किंवा धातूच्या भांड्यात दारू ठेवल्यास काहीवेळा रासायनिक अभिक्रिया होऊन दारूची मूळ चव बिघडू शकते. पण काच रासायनिकदृष्ट्या स्थिर असल्याने दारूची चव बदलत नाही. त्यासोबतच तुम्हाला प्रत्येक वेळी ताजी दारू प्यायल्याचा अनुभव येतो.

कोणत्याही पेयाची चव त्याच्या योग्य तापमानावर अवलंबून असते. विशेषतः कॉकटेल किंवा वाईनसाठी तापमान खूप महत्त्वाचं असतं. काचेचे ग्लास इतर भांड्यांपेक्षा तापमान अधिक काळ टिकवून ठेवतात.

काही ग्लास हे खालच्या बाजूने जाड असतात. ज्यामुळे हाताच्या उष्णतेचा दारूवर लगेच परिणाम होत नाही. तसेच दारु ज्या तापमानावर प्यायची आहे, त्याच तापमानावर ती अधिक काळ टिकून राहते, ज्यामुळे तिचा स्वाद बिघडत नाही.

दारू हे केवळ तहान भागवण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठी घेतलं जात नाही. बार किंवा रेस्टॉरंटमध्ये दारु पिताना तिचं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. काचेचे ग्लास दारूला एक सुंदर आणि आकर्षक स्वरूप देतात. त्यांचा आकार, त्यांची चमक आणि त्यातून दिसणारा दारूचा रंग यामुळे पिण्याचा अनुभव अधिक आनंददायी बनतो.

दारू काचेच्या ग्लासात देण्यामागे केवळ दिखावा नाही. त्यामागे रंग, चव, सुगंध, स्वच्छता, सुरक्षितता आणि योग्य तापमान राखणं हे गरजेचे असते. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही काचेच्या ग्लासात दारू पिताना या कारणांचा नक्की विचार करा.