बेलापूर मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता, शिवसेनेच्या 50 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीत शिवसेना भाजपमधील जागावाटपाचा (Shivsena BJP Seat Distribution) तिढा कायम आहे.

  • सुरेश दास, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 23:05 PM, 30 Sep 2019
बेलापूर मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता, शिवसेनेच्या 50 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीत शिवसेना भाजपमधील जागावाटपाचा (Shivsena BJP Seat Distribution) तिढा कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते गणेश नाईक आपल्या नगरसेवकांसह भाजपमध्ये (Ganesh Naik Join BJP) आल्याने बेलापूर विधानसभा मतदारसंघासाठी (Belapur Assembly Constituency) त्यांची प्रमुख दावेदारी मानली जात आहे. दुसरीकडे स्थानिक शिवसैनिक देखील बेलापूर विधानसभा मतदारसंघावरुन आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या 50 पदाधिकाऱ्यांनी याच मुद्द्यावर राजीनामा (Resignation of 50 Shivsena Leader) दिला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता आहे.

बेलापूर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी गणेश नाईक यांना मिळण्याची शक्यता असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. बेलापूर विभागाचे शहरप्रमुख विजय माने यांच्यासह 50 पदाधिकाऱ्यांनी याविरोधात राजीनामे दिले आहेत. त्यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्याकडे आपले राजीनामे सोपवले आहेत. मंगळवारी (1 ऑक्टोबर) आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचाही बेलापूर मतदारसंघावर दावा

विधानसभा निवडणुकीनंतर मी बेलापूरमध्ये पुन्हा येणार त्यावेळी विजयी जल्लोष केला जाईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. यामुळे बेलापूरमधून शिवसेना निवडणूक लढवणार (Shivsena eyes on Belapur) असल्याचे तर्क लढवले जात होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. शिवसेना नेते विजय नाहता यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत भाजपवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली होती. भाजपची बेलापूरमध्ये मुस्कटदाबी करण्याची व्यूहरचना ‘मातोश्री’वरुनच सुरु झाल्याचंही त्यावेळी बोललं गेलं. पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांचा विजय संकल्प मेळावा वाशीमध्ये आयोजित केल्याने मातोश्रीचा याला पाठिंबा असल्याचंही बोललं गेलं.

नवी मुंबई, ठाण्यात गणेश नाईक यांचं वर्चस्व

गणेश नाईक हा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे.

गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली. यावेळी येथे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.