Mira Bhayandar : मुलांच्या डब्यात कांदा-लसूण नको; आमदाराच्या शाळेतील मेसेज वाचून नवा वाद
मिरा रोड येथील 'सेवेन स्क्वेअर अकॅडमी' या शाळेतील एक मेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पर्यूषण पर्वाच्या काळात मुलांच्या डब्यात काय द्यावे आणि काय देऊ नये असा उल्लेख करण्यात आला आहे. या वरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मिरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेत पर्यूषण काळाच्या पार्श्वभूमीवर एक नवा वाद पेटला आहे. शाळेने पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक मेसेज पाठवून विद्यार्थ्यांना डब्यात कांदा, लसूण, बटाटा आणि बीट यांसारखी कंदमूळ देऊ नयेत, असे आवाहन केले होते. या आवाहनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आक्षेप घेतला असून, “मुलांनी डब्यात काय खायचे हे ठरवणारी शाळा कोण?” असा सवाल उपस्थित केला आहे. ही शाळा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची असल्याने वाद अधिक तीव्र झाला आहे.
मिरा-भाईंदर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मराठी आणि अ-मराठी (विशेषतः उत्तर भारतीय, जैन, मारवाडी, गुजराती) भाषिकांमध्ये तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पर्यूषण काळातील विशिष्ट आहाराचा आग्रह आणि कंदमूळ पदार्थांवरील बंदीवरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
व्हॉट्सअॅप मेसेजवरून वादाची ठिणगी
मिरा रोड पूर्वेतील सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक मेसेज पाठवण्यात आला होता. त्यात पर्यूषण पर्वाच्या काळात विद्यार्थ्यांनी कांदा, लसूण, बटाटा आणि बीट डब्यात आणू नये, अशी विनंती करण्यात आली होती. तसेच, या काळात शाळेच्या कॅन्टीनमध्येही हे पदार्थ वापरले जाणार नाहीत, असे नमूद करण्यात आले होते.
काही पालकांनी हा मेसेज मनसेचे पदाधिकारी सचिन पोपळे यांना दाखवला. त्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली. सचिन पोपळे यांनी थेट प्रश्न केला, “मराठी माणसांच्या मुलांना आणि विद्यार्थ्यांना काय खाणार हे ठरवणारी शाळा कोण?” ही शाळा स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हटले, “उद्या एखाद्या मराठी उद्योजकाने शाळा सुरू केली आणि गटारीच्या वेळी विद्यार्थ्यांना चिकन, मटण किंवा अंडी आणण्यास सांगितले, तर ते शाळा प्रशासनाला मान्य होईल का?”
आमदार नरेंद्र मेहता यांची प्रतिक्रिया
वाढत्या वादावर प्रतिक्रिया देताना आमदार नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट केले की शाळेतर्फे कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. “पर्यूषण हा अत्यंत पवित्र काळ आहे. या काळात प्राणी आणि पशूंवर अन्याय होऊ नये, त्यांची कत्तल होऊ नये या सद्भावनेने पालकांना केवळ एक विनंती करण्यात आली होती. व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजमध्येही सक्तीचा उल्लेख नाही. यामागे कोणताही चुकीचा उद्देश नसून कोणीही या विषयावर राजकारण करू नये,” असे म्हटले आहे.
