राज्यपालांचा अजित पवारांना फोन, अजित पवार म्हणतात …

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेला वेळ वाढवून देण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला (Ajit Pawar on Governors call) चर्चेला बोलावले आहे.

राज्यपालांचा अजित पवारांना फोन, अजित पवार म्हणतात ...

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेला वेळ वाढवून देण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला (Ajit Pawar on Governors call) चर्चेला बोलावले आहे. राज्यपालांनी राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांना (Ajit Pawar on Governors call) फोन करुन चर्चेसाठी राजभवनात बोलावले. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत राज्यपालांना भेटण्यास जाणार असल्याचं सांगितलं.

अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आम्ही सर्व पदाधिकारी, नेते मुंबईत दिवसभर होतो. आमचं दिवसभर घडणाऱ्या सर्व घडामोडींवर लक्ष होतं. आम्हाला साडेआठ वाजता राज्यपालांचा फोन आला. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यांनी भेटायला बोलावलं आहे. मी जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ इत्यादी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेटण्यासाठी जातो आहे. राज्यपालांनी कशासाठी बोलावलं हे माहिती नाही. मी चॅनलवर राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेसाठी जात असल्याचं वाचलं, मात्र अद्याप तसं काहीही स्पष्ट झालेलं नाही.”

राज्यपालांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, “आम्हाला मॅजिक फिगर गाठण्यासाठी 145 जागांची आवश्यकता आहे. आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा निर्णय दिला होता. आघाडीतील सर्वच नेत्यांनी विरोधात बसण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतर तयार झालेल्या स्थितीनुसार आम्ही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. काँग्रेसच्या वरिष्ठांना सांगण्यात आलं असून त्यानंतर पत्राची कारवाई करू, असं आम्हाला सांगण्यात आलं. ते मित्रपक्ष असल्यामुळे त्यांचं आणि आमचं एकत्र पत्र देण्याचं ठरलं होतं.”

शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची इच्छा नाही : अजित पवार

शिवसेनेला दूर ठेवण्याचे कोणाचीही इच्छा नव्हती. मात्र, काँग्रेसचे पत्र वेळेवर पोहोचले नाही. प्रत्येकाने झटपट निर्णय घेतले, तर उद्याच (12 नोव्हेंबर) सगळं स्पष्ट होईन. एका पक्षाने सत्ता स्थापन करावी असा महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिलेला नाही. आता दोघांनी किंवा तिघांनी मिळूनच सरकार बनवावं लागेल. काहीही झालं तरी राज्याला कोणत्याही अपक्षांच्या मदतीशिवाय स्थिर सरकार मिळू शकतं, असंही अजित पवारांनी नमूद केलं.

मित्रपक्षांसोबत चर्चा करुन निर्णय घेऊ : जयंत पाटील

राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “संवैधानिक प्रक्रियेनुसार राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली. त्यानंतर आम्ही मित्रपक्षांसोबत चर्चा करुन निर्णय घेऊ असं कळवलं आहे. त्यांनी आम्हाला उद्या (12 नोव्हेंबर) रात्री 8.30 पर्यंतचा वेळ दिला आहे.”

राज्यात स्थिर सरकार यावं यासाठी तोडगा काढू : नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज 18 दिवस झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेला सरकार स्थापन होईल असं वाटत होतं. बहुमत भाजप-शिवसेनेला होतं. त्यांनी सरकार स्थापन करणं अपेक्षित होतं. मात्र, मुख्यमंत्री पदावरुन त्यांनी सरकार स्थापन केलं नाही. भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिला. शिवसेनेने पाठिंबा पत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. आम्ही राज्यात स्थिर सरकार यावं यासाठी काँग्रेससोबत बसून तोडगा काढत आहोत.”

सर्व घडामोडींवर लक्ष, योग्यवेळी निर्णय घेऊ : सुधीर मुनगंटीवार

या घडामोडींवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील भाष्य केलं. ते म्हणाले, “कोअर कमिटीची बैठक झाली. सध्याच्या घडामोडींवर आमचं लक्ष आहे. योग्यवेळी आम्ही यावर निर्णय घेणार आहोत.”

शरद पवारांना भेटून अंतिम चर्चा करणार : मल्लिकार्जून खर्गे

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, “आम्ही एक प्रेसनोट दिली आहे. त्यात हे नमूद केलं आहे की आम्ही सत्तास्थापनेसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. उद्या (12 नोव्हेंबर) शरद पवार यांना भेटून यावर अंतिम चर्चा होणार आहे.”

काय होतंय ते पाहुयात. राज्यपाल काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे. सत्तास्थापनेसाठी वेळ मागितला होता. ते काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे : पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रवादीशी अंतिम चर्चा केल्यानंतरच निर्णय : माणिकराव ठाकरे

सोनिया गांधींची शरद पवारांशी चर्चा झाली आहे. आता राष्ट्रवादीशी अंतिम चर्चा केल्यानंतरच निर्णय होईन, असं माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं.

दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसच्यावतीने काढलेल्या पत्रकात शिवसेनेला थेट पाठिंबा देण्याविषयी कोणताही थेट उल्लेख केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं ट्विट

राज्यपाल यांनी देखील ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “शिवसेनेने आज भेट घेऊन सरकार स्थापनेची इच्छा व्यक्त केला. मात्र, आवश्यक संख्याबळाचं आणि पाठिंब्याचं पत्र ते सादर करु शकले नाही. त्यानंतर शिवसेनेने पाठिंब्याचं पत्र सादर करण्यासाठी 3 दिवसांचा अधिक वेळ मागितला. यावर राज्यपालांनी आपली असमर्थतता दर्शवली.”

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI