Ajit Pawar : खातं वजनदार किंवा हलकं नसतं…, खातेवाटपावरील नाराजीच्या चर्चेवरुन अजितदादांचा मंत्र्यांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराज मंत्र्यांना टोला लगावलाय. आपण जे म्हणतो की हे वजनदार खातं, हे थोडसं हलकं फुलकं खातं असं नाही. तुम्हाला काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये तुम्ही काम करु शकता, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

Ajit Pawar : खातं वजनदार किंवा हलकं नसतं..., खातेवाटपावरील नाराजीच्या चर्चेवरुन अजितदादांचा मंत्र्यांना टोला
अजित पवार, विरोधी पक्षनेते
Image Credit source: Google
सुनील काळे

| Edited By: सागर जोशी

Aug 15, 2022 | 5:39 PM

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर (Cabinet Expansion) रविवारी खातेवाटपही जाहीर झालं. या खातेवाटपावरुन सरकारमधील मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), दादा भुसे आणि संदीपान भुमरे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत तिनही नेत्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता कोणतंही खातं महत्त्वाचं आणि कोणतंही खातं कमी महत्त्वाचं नसतं. सर्व खाती महत्त्वाची असतात, असं शिंदे गट आणि भाजपकडून सांगितलं जात आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाराज मंत्र्यांना टोला लगावलाय. आपण जे म्हणतो की हे वजनदार खातं, हे थोडसं हलकं फुलकं खातं असं नाही. तुम्हाला काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये तुम्ही काम करु शकता, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

‘काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये काम करु शकता’

मंत्र्यांच्या नाराजीबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की, आज शिंदे साहेबांचं सरकार आहे. आज त्यांच्या सरकारमध्ये कुणाला मंत्री घ्यायचं, कुणाला नाही घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. कुणाला कोणती खाती द्यायची हा देखील सर्वस्वी अधिकार एकनाथराव शिंदे साहेबांचा आहे. त्यामुळे त्याबद्दल त्यांना जे योग्य वाटलं आणि आपण जे म्हणतो की हे वजनदार खातं, हे थोडसं हलकं फुलकं खातं असं नाही. तुम्हाला काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये तुम्ही काम करु शकता. त्यातून वेगवेगळे लोक अनेक अर्थ काढू शकतात.

कोणत्या मंत्र्यांची नाराजी?

खातेवाटपात दादा भुसे यांच्याकडे बंदरे आमि खनिकर्म, दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, तर संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन हे खातं देण्यात आलं आहे. कमी महत्वाचं खातं देण्यात आल्यानं हे मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, नाराजीच्या चर्चांनंतर या मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दादा भुसेंचं स्पष्टीकरण

माझी तब्येत बरी नसते. प्रवास करणं किंवा दगदग करणं जमत नाही. प्रवासामुळे मला शारिरीक त्रास होत होता. मी गेल्या वर्षभरापासून खातं बदलून देण्याची मागणी केली होती. मागच्या सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आताच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दुसरी जबाबदारी देण्याची मागणी केली होती. कोणतीही जबाबदारी आपल्याला विश्वासाने दिली जाते त्या जबाबदारीला न्याय दिला पाहिजे, असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे.

‘सामना’तील टीकेला केसरकरांचं उत्तर

महाविकास आघाडी असताना जी खाती शिवसेनेकडे होती तीच खाती आम्हाला मिळाली आहेत. उलट आरोग्य खात्यासारखं एक मोठं खातं आम्हाला मिळालं आहे. पर्यटनापेक्षा आरोग्य खातं मोठं आहे. मोठं खातं येत असताना एखादं छोटं खात सोडावं लागतं. सामनामधून टिका करण्यापेक्षा त्यावेळेला जर अधिक जोर केला असता तर चांगली चांगली खाती शिवसेनेच्या वाट्याला आली असती. या सरकारमध्ये तीच खाती आमच्या वाट्याला आली असती, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें