कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी युतीचं जागा वाटपावर शिक्कामोर्तब, काय ठरलं?
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर कल्याण -डोबिवली महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे. या महापालिकेत शिवसेना शिंदे गट हाच मोठा भाऊ असणार आहे.

राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यास देखील सुरुवात झाली आहे. येत्या 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत, दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे, राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची युती झाली आहे. कल्याण, डोंबिवली महापालिकेसाठी देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली असून, आता जागा वाटप देखील ठरल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजप 50 तर शिवसेना शिंदे गट 65 जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर उर्वरीत 7 जागांवर मैत्रीपूर्व लढत होणार आहे. काही प्रभागामध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर देखील झालं आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा युतीचा फॉर्म्यूला ठरवल्याची माहिती समोर येत आहे,
दरम्यान दुसरीकडे मुंबई महापालिकेसाठी देखील महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे, याबद्दल भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी माहिती दिली आहे. मुंबईमध्ये 128 जागा भाजप लढणार आहे, तर 79 जागा शिवसेना लढणार आहे, तर उर्वरित वीस जागांबाबत पेच कायम आहे.
दरम्यान यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्यामुळे हे एक मोठं आव्हान महायुतीसमोर असणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढत आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गट ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटासोबत युती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस देखील ही निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे, त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसोबत युती करणार की शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युती करणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
