Anil Parab : 13 तास ईडीकडून चौकशी, अनेक ठिकाणी छापेमारी… कारवाईनंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

Anil Parab : 13 तास ईडीकडून चौकशी, अनेक ठिकाणी छापेमारी... कारवाईनंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया
अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी
Image Credit source: TV9

तब्बल 13 तास चाललेल्या या छापेमारीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आणि कागदपत्रे जप्त केले आहेत. ईडीची कारवाई संपल्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केल्याचं, त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिल्याचं सांगितलं.

दिनेश दुखंडे

| Edited By: सागर जोशी

May 26, 2022 | 8:35 PM

मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानासह अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने छापेमारी केली. सकाळी लवकर सुरु झालेली ही छापेमारी रात्री 8 च्या सुमारास संपली. तब्बल 13 तास चाललेल्या या छापेमारीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस (Electronic Device) आणि कागदपत्रे जप्त केले आहेत. ईडीची कारवाई संपल्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केल्याचं, त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिल्याचं सांगितलं.

अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया काय?

आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या शासकीय निवासस्थान, मी राहतो त्या घरावर, माझ्याशी संबंधित काही लोकांवर छापे घातलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या बातम्या सतत येत होत्या. ईडीची कारवाई होणार हे बोललं जात होतं. यामागचा गुन्हा काय हे तपासलं असता असं लक्षात आलं की दापोली इथलं साई रिसॉर्ट. जे मी सांगतोय की त्याचे मालक सदानंद कदम आहे. त्यांनी ते कागदपत्रांद्वारे सांगितलं आहे. त्यांनी कोर्टातही तसा दावा केलाय. त्यांनी खर्चाचा हिशेबही दिलाय. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आयटीची रेड पडली आहे. हे रिसॉर्ट अजूनही सुरु झालं नाही. हे रिसॉर्ट पूर्ण झालेलं नाही. असं असताना पर्यावरणाची दोन कलम लावून या रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जातं, त्याबाबत केंद्रीय पर्यावरण खात्यानं गुन्हा दापोली पोलीस ठाण्यात दाखल केल्या. हे रिसॉर्ट चालू नाही तरीही माझ्या नावानं, साई रिसॉर्टच्या नावे अशी नोटीस काढली गेली. एक तक्रार देण्यात आली. त्या तक्रारीला प्रेडिगेटेड ऑफेन्स समजून आज ईडीने माझ्यावर कारवाई केलीय.

‘मी कायद्याला सामोरा जायला तयार’

त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की ज्या यंत्रणा मला कुठलाही प्रश्न विचारतील त्याला उत्तर देण्यास मी बांधील आहे. पूर्वीही उत्तरं दिली होती. आजही दिली. पुढेही उत्तरं देण्याची माझी तयारी आहे. समुद्रात जर बंद रिसॉर्टचं सांडपाणी जात असेल तर त्यात मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा येतो कुठे. याचा खुलासा कोर्टात होईल. मी कायद्याला सामोरा जायला तयार आहे. कायद्यान्वये काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही हे मला माहिती आहे, असंही परब यावेळी म्हणाले.

तसंच काही कागदपत्र मी दिली ती त्यांनी घेतली आहेत. बाकी काही त्यांनी घेतलं नाही. मला कळत नाही की ज्या लोकांवर छापे पडले त्यातील किती लोकांचा रिसॉर्टशी संबंध आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें