प्रत्येक आपत्तीत राजकारण करण्याचा काही नेत्यांना महारोग; आशिष शेलार यांची घणाघाती टीका

तौक्तेच्या तडाख्यात बुडालेल्या बार्ज ‘पी-305’ वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू झालं आहे. (ashish shelar demand mumbai police commissioner to inquiry of Barge P305 incident)

प्रत्येक आपत्तीत राजकारण करण्याचा काही नेत्यांना महारोग; आशिष शेलार यांची घणाघाती टीका
आशिष शेलार, भाजप नेते

मुंबई: तौक्तेच्या तडाख्यात बुडालेल्या बार्ज ‘पी-305’ वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या प्रकरणी केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा मागितला आहे. त्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांना प्रत्येक आपत्तीत राजकारण करण्याचा महारोग झाला आहे, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे. (ashish shelar demand mumbai police commissioner to inquiry of Barge P305 incident)

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. भाजपच्या अखिल भारतीय नाविक संघाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मीही त्यांच्यासोबत होतो. आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन बार्ज ‘पी-305’च्या दुर्घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. या दुर्घटनेतील दगावलेल्या 80 लोकांचे मृतदेह सापडलेले नाहीत. किंवा मृतांचा आकडाही समोर आलेला नाही. या घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यातून दुर्घटनेला कोण जबाबदार आहे, ते कळून येईल. परंतु, महाराष्ट्रातील काही नेत्यांना प्रत्येक आपत्तीत राजकारण करण्याचा महारोग झाला आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

खऱ्या गुन्हेगारांना वाचवलं जात आहे

कॅप्टन राकेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. राज्य सरकार आणि पोलीस खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करतानाच चौकशी भरकटली पाहिजे अशी भूमिका सरकारने घेतली आहे का?, असा सवाल शेलार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना केला आहे.

अफकॉन्सच्या मालकाला सरकार वाचवतंय

चक्रीवादळ येणार याची माहिती आधीच होती. त्याचे 11 मे रोजी नोटिफिकेशन्सही निघाले होते. पण अफकॉन्सच्या मालकाने समुद्रातच राहण्याचा निर्णय घेतला. 10 मे रोजी त्यांनी ओएनजीसीला पत्रं लिहिलं होतं. त्यात आम्हाला काम करायचं आहे, असं लिहिलं आहे. 15 जूनपर्यंत काम करण्याची परवानगीही त्यांनी ओएनजीसीला मागितली होती. मात्र नेव्हल सेक्युरिटीने त्यांना परवानगी दिली नाही. त्यांना परत येण्याचे निर्देश दिले. मात्र, या सर्व प्रकरणाचं खापर केवळ कॅप्टनवर फोडून अफकॉन्सच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. कॅप्टन राकेश अजूनही सापडलेले नाहीत. त्यामुळे नेमकं काय घडलं? आणि त्यांची बाजू काय आहे? हे अजून बाहेर आलेलं नाही. मात्र, अफकॉन्सच्या शापूर पालनजी यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असून यातील झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? असा सवालही त्यांनी केला.

अफकॉन्सच्या मालकावर गुन्हा दाखल करा

शापूर पालनजी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसे निवेदन आम्ही पोलिसांना दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही अफकॉन्सच्या मालकावर ताबडतोब गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत ही आमची विनंती आहे, असं ते म्हणाले.

राज्यपालांना बंधन नाही

यावेळी त्यांनी राज्यपालांनी नियुक्त करावयाच्या सदस्यांच्या नियुक्तीवर कोर्टाने केलेल्या प्रश्नावर बोलणं टाळलं. न्यायालयीन लढाईत अधिक बोलणं योग्य नाही. मात्र, मी जो काही कायद्याचा अभ्यास केला आहे. त्यानुसार अमूक दिवसात राज्यापालांनी निर्णय घ्यावा, असं काही बंधन त्यांच्यावर टाकण्यात आलेलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शेलारांचे सवाल

◆ समुद्रात कोणत्याही प्रकारचे काम करणाऱ्या जहाजांना ओएनजीसीच्या नियमानुसार दरवर्षी 15 मे रोजी पाण्याबाहेर यावे लागते. त्यासाठी सदर काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला 12 मे रोजी कर्मचाऱ्यांना परतीच्या प्रवासाला घेऊन निघणे आवश्यक असते. मग अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेने 15 जून पर्यंत मुदतवाढीची मागणी का केली होती?

◆ 11 मे ला संपूर्ण किनारपट्टीवरील यंत्रणांना तौक्ते चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता, असे असताना सदर अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेने बार्जवरील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी का आणले नाही?

◆ ओएनजीसीच्या अन्य कंत्राटदार कंपन्यांनी वादळाची पूर्व कल्पना मिळताच आपल्या कर्मचाऱ्यांना पाण्याच्या बाहेर आणले होते. मग याच एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वेळीच सुरक्षितपणे पाण्याबाहेर का काढले नाही?

◆ या क्षेत्रात बंधनकारक असलेल्या नेव्हल सिक्युरिटी सर्टिफिकेट (एनएससी) डिफेन्स, ओएनजीसीने अफकॉन्सला मुदतवाढ दिलेली नाही. तरीही काम का सुरू ठेवले?

◆ बार्जला इंजिन नसल्याने त्याला वाहून नेणारे जहाज आणि तांत्रिक मदत करणारे कंत्राटदार कंपनीची यंत्रणा दुर्घटना घडली तेव्हा तैनात नव्हती अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. हे खरे आहे का?

◆ एकट्या कॅप्टनला जबाबदार धरून सदरची कंत्राटदार कंपनी या दुर्घटनाप्रकरणातून अलिप्त कशी काय राहू शकते? किंबहुना ही सर्वस्वी जबाबदारी सदर कंत्राटदार कंपनीचीच आहे.

◆ सदर कंत्राटदार कंपनीला हे काम मिळाले तरी सदर कंपनी तांत्रिक दृष्टीने सक्षम नसल्याचा वाद अद्याप न्यायप्रविष्ट आहे याचा या घटनेच्या तपासात काही संबंध उपयोगी ठरू शकतो का?

◆ नियमितपणे मान्सूनपूर्व कामे थांबवून वेळीच पाण्याबाहेर येणे आवश्यक असताना सदर कंपनीने काम का सुरू ठेवले? यातून ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे या प्रकरणी सदर कंपनीवर फौजदारी कारवाई करण्यात येऊन सदर घटनेतील हलगर्जीपणा, बेकायदेशीर काम, बेजबाबदारपणा जनतेसमोर येणे आवश्यक आहे.

◆ त्यामुळे सदर घटनेची चौकशी व्हावी. मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई मिळावी. कंपनीची चूक दिसून आल्यास कंपनीचे कंत्राट रद्द करॉून कंपनीला काळ्या यादीत टाकावे. (ashish shelar demand mumbai police commissioner to inquiry of Barge P305 incident)

 

संबंधित बातम्या:

Barge P305 : ONGC कडून मृत्युमुखी आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्यासह बचावलेल्यांनाही आर्थिक मदत

Barge P305 | मी जहाजावरुन परत आलो की बोलू, पण…, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांचा हंबरडा

Photo : INS कोची जहाजाला ‘तौक्ते’ने घेरलं, समुद्रात रेस्क्यू ऑपरेशन, 14 मृतदेह सापडले; 184 जणांची सुटका

(ashish shelar demand mumbai police commissioner to inquiry of Barge P305 incident)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI