अशोक चव्हाणांना सोळा नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाचे वेध?

नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात मला चांगल्या व्यक्ती हव्या आहेत, असं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलं (Ashok Chavan Congress Nanded)

अशोक चव्हाणांना सोळा नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाचे वेध?

नांदेड : नांदेडमध्ये आणखी काही दिग्गज नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात मला चांगल्या व्यक्ती हव्या आहेत, असं वक्तव्य चव्हाणांनी केलं. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात नव्या नेत्याच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते मारोती कवळे (Maroti Kawle) यांच्या काँग्रेस प्रवेशावेळी अशोक चव्हाण बोलत होते. (Ashok Chavan hints at new leaders joining Congress in Nanded)

नायगांव विधानसभा मतदारसंघात मला मारोती कवळे यांच्या रुपाने भाऊच मिळाला, अशा शब्दात चव्हाणांनी स्तुतिसुमनं उधळली. नांदेड जिल्ह्यातील उमरी भागात काँग्रेसच्या पक्षप्रवेश सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या निमित्ताने काँग्रेसने केलेल्या शक्तीप्रदर्शनाची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

भोकर नगरपंचायतीसाठी चव्हाण मैदानात

दुसरीकडे, भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये शिवसेनेची सत्ता आल्यामुळे अशोक चव्हाण यांना नुकताच जोरदार धक्का बसला होता. आता भोकर नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नांदेडचे पालकमंत्री या नात्याने अशोक चव्हाणही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भोकर शहरात आगामी काळात विविध विकास कामांचे उद्घाटन ते करणार आहेत.

कोण आहेत मारोती कवळे?

वंचित बहुजन आघाडीचे विधानसभेचे उमेदवार राहिलेले मारोती कवळे गुरुजी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला उमरी तालुक्यातील एक प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या कवळे गुरुजींच्या काँग्रेस प्रवेशाने नायगांव विधानसभा मतदारसंघातील चित्रच बदलणार आहे.

राष्ट्रवादी सोडून वंचितमध्ये प्रवेश

कवळे गुरुजी या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले मारोती कवळे हे एक यशस्वी उद्योजक आहेत. पतपेढीच्या माध्यमांतून कवळे गुरुजींनी हजारो शेतकऱ्यांना आर्थिक हाथभर लावत पायावर उभे केलंय. दूध, गुळाच्या व्यवसायात त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आपल्याशी जोडलेलं आहे. माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे कट्टर समर्थक असलेले कवळे गुरुजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते.

अजित पवारांच्या मर्जीतील नेते

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खास मर्जीतील नेते म्हणून देखील कवळे गुरुजींची ओळख आहे. मात्र गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीत उडी मारली आणि नायगाव विधानसभा लढवली. या निवडणुकीत त्यांनी भरघोस मते घेतली मात्र इथून भाजपचा उमेदवार विजयी झाला. या अपयशानंतर कवळे गुरुजी गेली वर्षभर राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिले. (Ashok Chavan hints at new leaders joining Congress in Nanded)

चव्हाण यांचे राजकीय गणित

नायगांव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे. त्यामुळे नायगांव विधानसभा मतदारसंघात रिक्त होणारी पोकळी कवळे गुरुजींच्या माध्यमातून भरली जाणार आहे. एक चारित्र्यसंपन्न , मितभाषी आणि मदतीसाठी धावणारा नेता अशी कवळे गुरुजींची ओळख आहे.

विधानसभेला तिकिटाची शक्यता

कवळे गुरुजींच्या चांगल्या प्रतिमेमुळे नायगांव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस त्यांना संधी देऊ शकते. नांदेड लोकसभेत पराभव झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात बेरजेचे राजकारण सुरू केलं आहे. चांगल्या नेत्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी चव्हाण प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कवळे गुरुजींचा राजकीय प्रवेश हा जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्र बदलणारा ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

अशोक चव्हाण यांचं बेरजेचं राजकारण, वंचितच्या नेत्याचा काँग्रेस प्रवेश

ग्रामपंचायतीत धक्का, अशोक चव्हाण नांदेडमधील सर्वात महत्त्वाच्या नगरपंचायत निवडणुकीसाठी मैदानात

(Ashok Chavan hints at new leaders joining Congress in Nanded)

Published On - 8:18 am, Mon, 25 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI