हिवाळी अधिवेशनावरुन भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा, कोरोना नियमावलीवरुनही घणाघात

कोरोना विषाणूचा नवा प्रकार आणि अधिवेशन हा योगायोग आहे. मात्र, संसदेचं अधिवेशन पूर्ण वेळ सुरु आहे. त्यामुळे या सरकारला पूर्णकाळ अधिवेशन घ्यायला काहीच हरकत नव्हती. मुंबई आणि नागपूर दोन्ही विधिमंडळात सोशल डिस्टन्सिंग पाळून बसण्याची आसनव्यवस्था आहे. मात्र, या सरकारला केवळ पळ काढायचा आहे, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.

हिवाळी अधिवेशनावरुन भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा, कोरोना नियमावलीवरुनही घणाघात
उद्धव ठाकरे, अतुल भातखळकर

मुंबई : राज्याचं हिवाळी अधिवेशन केवळ 5 दिवसांचं असणार आहे. तसंच हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना विमानातून प्रवास करण्यास मनाई करण्यात आल्याने यंदाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. शिवाय मार्चमध्ये विशेष बाब म्हणून नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.

कोरोना विषाणूचा नवा प्रकार आणि अधिवेशन हा योगायोग आहे. मात्र, संसदेचं अधिवेशन पूर्ण वेळ सुरु आहे. त्यामुळे या सरकारला पूर्णकाळ अधिवेशन घ्यायला काहीच हरकत नव्हती. मुंबई आणि नागपूर दोन्ही विधिमंडळात सोशल डिस्टन्सिंग पाळून बसण्याची आसनव्यवस्था आहे. मात्र, या सरकारला केवळ पळ काढायचा आहे, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.

लग्न समारंभात कोरोना नियम पायदळी, भातखळकरांची टीका

दरम्यान, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगावर नवं संकट उभं राहिलं आहे. दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोन आणि डोंबिवलीत आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोना नियमांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाह सोहळा आज पार पडतोय. मात्र, या विवाह सोहळ्यात कोरोना नियमांचं पालन होत नसल्याचा आरोप भातखळकर यांनी केलाय. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याचं भातखळकर म्हणाले. राज्यात नियम फक्त सर्वसामान्य जनतेला आहेत. सरकारमधील मुख्यमंत्री आणि आमदारांच्या कार्यक्रमाला नाही, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांचीही ठाकरे सरकारवर टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच दिवसांचं अधिवेशन घेण्यात येत असल्याबद्दल ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. अधिवेशन न घेण्याची सरकारची कार्यप्रणाली आहे. चार-पाच दिवसच अधिवेशन घेण्याचं या सरकारचं घटत आहे. एकूण कामकाजाचे दिवस पाच आहेत. त्यातील पहिला दिवस केवळ शोक प्रस्तावात जातो. म्हणजे चार दिवसाचं अधिवेशन होणार आहे, असं फडणवीस म्हणाले.

यंदा अधिवेशन मुंबईत होणार आहे. अधिवेशन नागपूरलाच झाली पाहिजे असं तिथल्या नागरिकांना वाटत आहे. आपली फसवणूक होत आहे असं जनतेला वाटतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात होते. त्यांना विमानाने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन मुंबईत घेण्यात येत असल्याचं आम्हाला सांगितलं गेलं. आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. पण मार्चचं अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी केली. त्यावर बैठक करणार आहे. विशेष बाब म्हणून अधिवेशन घेण्यात येणार आहे, असं ते म्हणाले.

इतर बातम्या :

Karjat Election : कर्जत नगर पंचायत निवडणुकीवरुन पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये सामना! कोण बाजी मारणार?

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात

Published On - 5:41 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI