बच्चू कडू, राजकुमार पटेल यांच्यासह दोन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 56 उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर आता 4 अपक्ष आमदारांनी शिवसेनेला जाहीर (Bacchu Kadu support Shivsena) समर्थन दिले आहे.

  • हेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 8:30 AM, 27 Oct 2019
बच्चू कडू, राजकुमार पटेल यांच्यासह दोन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तेच्या समीकरणाची जुळवाजुळवी सुरु झाली आहे. सत्ता स्थापनेसाठी विविध पक्षांकडून अपक्षांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरु झाला (Bacchu Kadu support Shivsena) आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 56 उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर आता 4 अपक्ष आमदारांनी शिवसेनेला जाहीर (Bacchu Kadu support Shivsena) समर्थन दिले आहे. यामुळे आता शिवसेना समर्थकांची संख्या 60 वर पोहोचली आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोन आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी (26 ऑक्टोबर) भेट घेतली. या भेटीनंतर या दोन्ही आमदारांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दर्शवला. आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. याशिवाय रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.

विधानसभेत शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले होते. यानंतर आता प्रहार जनशक्तीच्या दोन आमदारांसह आणखी दोन अपक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेना समर्थक आमदारांची संख्या आता 60 झाली आहे.

दरम्यान प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा देताना काही मुद्देही मांडले आहे. शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोहयो मधून करणे. दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी करणे, अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवणे. या मुद्द्यांवर बच्चू कडू यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला (Bacchu Kadu support Shivsena) आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या, आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर प्रहार आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका समान असल्याने त्यांनी शिवसेनाला पाठिंबा दर्शवला आहे.

प्रहारचे संस्थापक आमदार बचू कडू, ( अचलपूर ) आणि आमदार राजकुमार पटेल ( मेळघाट ) यांनी पाठिंब्याचे पत्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना दिलं आहे. प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्ण ताकतीने शिवसेनेच्या सोबत राहणार असल्याचेही बचू कडू यांनी यावेळी सांगितले.