ग्रामपंचायत धुरळा : अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेससमोर शिवसेनेचं आव्हान

| Updated on: Jan 15, 2021 | 7:54 PM

काँग्रेसचा मजबूत किल्ला म्हणून अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील बारड गावाची ओळख आहे. (Nanded Gram Panchayat Ashok Chavan)

ग्रामपंचायत धुरळा : अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेससमोर शिवसेनेचं आव्हान
Follow us on

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने आपलं पॅनल मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे राज्यात हातात हात घालून चालणारी महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर एकमेकांशी दोन हात करताना दिसत आहे. (Barad Nanded Gram Panchayat Election Congress vs Shivsena Ashok Chavan)

काँग्रेसचा मजबूत किल्ला म्हणून अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील बारड गावाची ओळख आहे. त्यामुळेच मंत्री अशोक चव्हाण हे याच भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. इथल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुनील देशमुख हे काँग्रेसचे पॅनल प्रमुख असून त्यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

शिवसेनेने बारड गावात काँग्रेसच्या विरोधात आपले पॅनल मैदानात उतरवले आहे. तब्बल आठ हजार मतदार या गावात आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. सातत्याने काँग्रेसकडे असलेल्या या ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते.

सायाळ ग्रामपंचायत : भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ

नांदेड तालुक्यातील सायाळ ग्रामपंचायतीवर काँग्रेसची दीर्घकाळ सत्ता राहिली आहे. मात्र आता सायाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नऊ सदस्य संख्या असलेल्या सायाळमध्ये सत्तेसाठी भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. अवघे अठराशे मतदार असलेल्या या गावाच्या निवडणुकीत मतदारांची आतापासून बडदास्त ठेवण्यात येत आहे.

दर्यापूरची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम

नांदेड तालुक्यातील दर्यापूर इथल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधपणे काढण्याचे जाहीर केलं आहे. दर्यापूर या गावाने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जोपासली आहे. गावात बहुसंख्य असणाऱ्या मराठा समाजाने वादविवाद टाळण्यासाठी ही प्रथा जोपासली आहे. या गावाची लोकसंख्या 740 असून गावकऱ्यांनी एकोपा आणि बंधुभाव कायमस्वरुपी जपला आहे. त्यातून जिल्ह्यात एक चांगले गाव म्हणून दर्यापूर गावाने आपली ओळख निर्माण केली आहे.

दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केली. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या खानापूर गावात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र शिवसेनेचा मेरु रोखण्यासाठी भाजपने चक्क ‘हाता’वर ‘घड्याळ’ बांधले. भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे स्थानिक नेते एकत्र आले.

संबंधित बातम्या :

चंद्रकांतदादांच्या गावातच भाजपच्या ‘हाता’वर ‘घड्याळ’, शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती

40 वर्ष सत्ता राखणारा नेता हरपला, नांदेडमधील ग्रामपंचायतीत आता भाजप vs भाजप

(Barad Nanded Gram Panchayat Election Congress vs Shivsena Ashok Chavan)