बारामतीत थेट पवार विरुद्ध फडणवीस लढत, 21 लाख मतदार खासदार ठरवणार!

बारामतीत थेट पवार विरुद्ध फडणवीस लढत, 21 लाख मतदार खासदार ठरवणार!

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील 14 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये काही हायप्रोफाईल लढती आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे बारामती. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बारामतीची जागा जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे.

बारामतीसाठी युतीकडून कांचन कुल, तर आघाडीकडून सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचंही मुख्य उमेदवारांसमोर आव्हान असेल. तब्बल 21 लाख 12 हजार 408 मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात 2372 मतदान केंद्र आहेत. यातील 62 मतदान केंद्र संवेदनशील असून 285 मतदान केंद्रात वेब कास्टिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर पोहोच करण्यात आली. बारामती एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामातून बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रांचं वितरण करण्यात आलं. तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांच्या केंद्राध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांनाही आजपासून निवडणुकीचा कार्यभार सोपवण्यात आला. यावर्षी बारामतीत 15 आदर्श मतदान केंद्र आहेत. जवळपास 40 मतदान केंद्रातून वेब कास्टिंग केलं जाणार असल्याचं प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सांगितलं.

मताधिक्य घटणार की वाढणार?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न यामुळे तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीची अक्षरश: कोंडी झाली होती. मात्र बारामती, इंदापूर आणि भोर या विधानसभा मतदारसंघांची साथ मिळाल्याने सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. त्यावेळी दौंडमधून महादेव जानकर यांना तब्बल 25 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. तर पुरंदर, खडकवासला मतदारसंघातही जानकर आघाडीवर होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दौंडमध्ये राहुल कुल हे तब्बल 11 हजार 345 मतांनी निवडून आले होते. सद्यस्थितीचा विचार करता दौंडसह मागच्या निवडणुकीप्रमाणेच मताधिक्य घटणार की वाढणार हेही पाहणं महत्वाचं ठऱणार आहे.

कोण आहेत कांचन कुल?

दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील असून त्या पवार कुटुंबीयांच्या अर्थात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नात्यातील आहेत. कांचन कुल दौंडमध्ये काही प्रमाणात सक्रिय आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग दिसून येतो. त्यांचे पती राहुल कुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटचे सहकारी मानले जातात. 2014 साली राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवत राहुल कुल यांनी माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांचा पराभव केला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI