लोकशाही टिकवण्यासाठी जागृत राहा, सरकारी संस्था टिकल्या पाहिजेत : शरद पवार

लोकशाही टिकवण्यासाठी जागृत राहा, सरकारी संस्था टिकल्या पाहिजेत : शरद पवार

बारामती : सध्या सर्वत्रच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. साधारण आणखी काही वर्षे या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. दुष्काळ निवारणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची असते. मात्र वेगवेगळ्या स्वरुपात मदत करत देवस्थान संस्थांनीही या कामात हातभार लावला पाहिजे, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. लोकशाहीत निकाल काहीही लागला तरी संस्था टिकल्या पाहिजेत. त्याचवेळी लोकशाही टिकवण्यासाठीही आग्रही राहिलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलंय.

जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलिसिस सेंटरचं उद्घाटन आणि पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णवाहिका लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. आणखी काही वर्षे हिच स्थिती राहिल असा अंदाज आहे. दुष्काळ निवारणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य शासनाची असली तरी देवस्थान संस्थांनीही हातभार लावला पाहिजे. अशा काळात देवस्थानांनी शिक्षणासारखी जबाबदारी स्वीकारावी, असंही त्यांनी सांगितलं.

देवस्थानांकडे येणाऱ्या पैशांचं योग्य पद्धतीने नियोजन केलं तर त्याचा स्थानिक विकासाला फायदा होतो. आपण मुख्यमंत्री असताना राज्यातील काही देवस्थानांची सुधारणा केली. त्याचे चांगले परिणाम त्या त्या परिसरात झाले. त्यामुळेच देवस्थान ही स्थानिक विकासाला चालना देणारी ठरावीत, असं शरद पवार यांनी म्हटलं.

निवडणुकांवर चर्चा करण्याचं हे व्यासपीठ नाही. निवडणुका येतील-जातील, पण देशाची लोकशाही टिकली पाहिजे ही भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे. सध्या देशात काय सुरुय हे आपण सर्वजण पाहतोय. लोकशाहीत काहीही निकाल लागला तरी संस्थांवर हल्ले होणार नाहीत याची जबाबदारी जागृत नागरिकांनी घेणं गरजेचं असल्याचं सांगत शरद पवार यांनी सद्यस्थितीवर मार्मिक टिप्पणी केली.

Published On - 2:18 pm, Sun, 10 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI