सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा ते भिकारदास मारुती, पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही : अजित पवार

| Updated on: Aug 20, 2021 | 8:32 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सकाळी पुण्यात शाब्दिक फटकेबाजी केली. पुणेकरांच्या स्वभावाचं वर्णन करताना त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही, असं म्हणत त्यांनी पुण्यातील सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा ते भिकारदास मारुती, अशा देवांची नावे सांगितली.

सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा ते भिकारदास मारुती, पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही : अजित पवार
Follow us on

पुणे :  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सकाळी सकाळी पुण्यात शाब्दिक फटकेबाजी केली. पुणेकरांच्या स्वभावाचं वर्णन करताना त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही, असं म्हणत त्यांनी पुण्यातील सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा ते भिकारदास मारुती, अशा देवांची नावे सांगितली. अगदी सातच्या कार्यक्रमाला अजित पवार दहा मिनिटे अगोदर उपस्थित राहिले. त्यावरही त्यांनी टोला लगावत ‘जे सूर्यमुखी असतील ते मला शिव्या देत असतील’, असं म्हटलं. तर मला सकाळी सकाळी कार्यक्रम घ्यायला आवडतो, असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

अजित पवारांच्या हस्ते संजीवन उद्यानाचा भूमीपूजन सोहळा संपन्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात संजीवन उद्यानाचा भूमीपूजन सोहळा पार पडला. वारजे परिसरात वन विभागाच्या जागेवर हे उद्यान साकारणार आहे. सकाळी सात वाजता अजित पवार कार्यक्रम स्थळी हजर झाले. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. अजित पवारांच्या फटकेबाजीने भल्या सकाळी पुणेकर हास्यात दंगून गेले.

पुणेकरांचा हात कुणीच धरु शकत नाही!

अजित पवार म्हणाले, “नावं ठेवण्यात पुणेकरांचा हात कुणीही धरु शकणार नाही. आता जिथे हा कार्यक्रम होतोय तिथे जुन्या काळी विचित्र अपघात, खून मारामाऱ्या होत असायचे. तसंच या भागात रान डुकरांचा जास्त वावर होता. याभागाला ‘डुक्कर खिंड’ असं म्हटलं जातं. तसंच पुण्यातील अनेक ठिकाणांना अशाच प्रकारची नावं आहेत. पुणेरी पाट्यांचं कुतूहल सगळीकडे आहे. खरोखरंच पुणेकरांचा हात कुणी धरू शकत नाही. नावं ठेवण्यात तर नाहीच नाही… अहो, पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही”, अशी टोलेबाजी अजित पवार यांनी केली.

पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही!

“पुणेरी पाट्याचं कुतूहल सगळ्यांना आहे. त्यापाठीमागे पुणेकरांची असलेली कल्पना, निश्चित पुणेकरांचा हात कुणी धरु शकणार नाही, हे मी आपल्या सगळ्यांना गॅरंटीने सांगतो, तुम्ही म्हणाल कसं काय.. तर आपण अनेक शहरांत जातो, पण आपल्या इथे पुण्यात काय म्हणतात, पासोड्या मारुती, सोट्या म्हसोबा… नुसता म्हसोबा नाही-सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर… उपाशी विठोबा, ताडीवाला दत्त, डुल्या मारुती, जिलब्या मारुती, भिकारदास मारुती….. पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही. जिथे देवांना सोडलं नाही तिथे माणसांची, ठिकाणांची काय कथा”, असं म्हणत अजित पवारांनी उपस्थितांमध्ये खसखस पिकवली.

भाजपच्या बक्षीसाला अजित पवारांचं उत्तर

महाविकास आघाडी सरकारने काय केलं ते दाखवा, असं बक्षीस भाजपकडून जाहीर करण्यात आलं, मात्र आढावा बैठकीत आम्ही या अनेक विकासकामांचा आढावा घेत असतो. पुण्यातील विकास कामांना निधी देण्याचं काम केलं, मेट्रोचा हप्ता थकायला नको म्हणून प्रयत्न करतोय, असं म्हणत त्यांनी पुणे शहराचे भाजपाध्यक्ष जगदीश मुळीक यांना उत्तर दिलं.

(Bhumi Pujan ceremony of Sanjeevan Udyan in Pune by DCM Ajit Pawar)

हे ही वाचा :

मुख्य मैदानावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, रातोरात समर्थकांनी दुसरं मैदान बनवलं, गोपीचंद पडळकरांचा ‘गनिमी कावा’ यशस्वी!