मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा थेट ओमराजेंना फोन, निंबाळकर म्हणाले तुम्हीच मला…
Omraje Nimbalkar and Uddhav Thackeray: खासदार ओमराजे निंबाळकर सध्या चांगलेच चर्चेत आहे. ते ठाकरे गटातून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असतानाच उद्धव ठाकरे यांनी ओमनिंबाळकर यांना फोन केला. दोघांमध्ये नेमकं काय संवाद झाला वाचा...

शिवसेना उद्धव ठाकरे गटा (UBT) मधील सहा खासदारांच्या फुटीच्या चर्चेनंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. ठाकरे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली, तर सोशल मीडियावर सामान्य शिवसैनिकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. याच पार्श्वभूमीवर काल पवनराजे निंबाळकर हत्या खटल्याचा कोर्टाचा निकाल निंबाळकर कुटुंबाच्या विरोधात लागला. या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला. निकाल विरोधात गेल्यानंतर ठाकरे गटाने ओमराजे यांची मनधरणी सुरू केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी देखील ओमराजेंना फोन केल्याचे बोलले जात आहे.
मध्यरात्री पुण्यात हायव्होल्टेज भेट
शनिवारी मध्यरात्री ठाकरे गटाचे दोन प्रमुख नेते आमदार कैलास पाटील आणि पक्ष सचिव वरुण सरदेसाई हे ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी पोहोचले. यावेळी सुमारे एक तास चर्चा झाली. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात फोनवरून महत्त्वाचे संभाषण झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी ओमराजे यांची भूमिका जाणून घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितले की, “मी अजूनही ठाकरे गटातच आहे. आपणच मला मोठे केले आहे. आज मी खासदार आहे, ते पक्षामुळे आणि तुमच्यामुळे. मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी कार्यकर्त्यांसोबत सर्व बाबतीत चर्चा करणार आहे.” ओमराजे यांनी पक्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि घाईघाईने कोणताही निर्णय न घेण्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले.
ठाकरे गटाने ओमराजे निंबाळकर यांना रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत इतर पाच बंडखोर खासदारांसह ओमराजे यांचाही शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता अद्याप कायम आहे. पुढील २४ तास या प्रकरणात निर्णायक ठरू शकतात. सध्या ओमराजे निंबाळकर हे कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांचा मतदार संघ धाराशिव येथे गेले आहेत. या चर्चेनंतर ते काय निर्णय घेणार यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
