मुंगेरीलाल के हसीन सपनें, भाजपकडून पवारांची खिल्ली उडवणारा VIDEO शेअर

मुंगेरीलाल के हसीन सपनें, भाजपकडून पवारांची खिल्ली उडवणारा VIDEO शेअर

मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील सर्व जागांवरील मतदान पार पडलं असलं, तरी राज्य भाजप अजूनही प्रचाराच्या मूडमधून बाहेर आली नाही. राज्य भाजपच्या ट्विटर हँडलवरुन व्यंगचित्राचा एक व्हिडीओ शेअर करुन, देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या स्वप्नाची भाजपकडून व्हिडीओच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे. यातून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

व्यंगचित्राच्या व्हिडीओत नेमकं काय आहे?

व्हिडीओमध्ये सुरुवातीला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत, असे दाखवण्यात आले आहे. मात्र, व्हिडीओ पुढे सरकतो आणि त्यातून शरद पवारांची खिल्ली उडवण्यात आली आहे. शरद पवार झोपलेले दाखवण्यात आले असून, “अहो बाबा उठा… झोपेत काय बडबडताय?” असे म्हणत सुप्रिया सुळे या शरद पवारांना झोपेतून उठवत आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार बेडवर झोपले असताना, त्यांच्या बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दाखवण्यात आले आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या चेहऱ्याला पोपटाचं शरीर लावण्यात आले आहे.

शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील निशाणा साधणाऱ्या या व्हिडीओला भारतीय जनता पक्षाने ‘मुंगेरीलाल के हसीन सपनें’ असे नाव दिले असून, हा व्यंगचित्रांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडून भाजपच्या या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI