माझी पक्षावर निष्ठा, मला खंजीर खुपसला तरी चालेल, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Oct 02, 2019 | 8:38 PM

माझी पक्षावर निष्ठा आहे. मला खंजिर खुपसला तरी चालेल. माझा प्राण घेतला तरी चालेल. भाजपचा विजय होणे महत्त्वाचे आहे, असं म्हणत मेधा कुलकर्णी भावनिक झालेल्या पाहायला मिळाल्या.

माझी पक्षावर निष्ठा, मला खंजीर खुपसला तरी चालेल, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी

पुणे : भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीतील तिकिट (BJP Assembly Election Ticket Distribution) वाटपावरुन चांगलीच उलथापालथ होताना दिसत आहे. काही ठिकाणचे बंड शमले आहेत, तर काही ठिकाणी सुरुच आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil in Kothrud) यांना कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर सुरुवातीला बंड करणाऱ्या मेधा कुलकर्णींनी (Medha Kulkarni) देखील आता माघार घेतली आहे. त्यांनी स्वतः चंद्रकांत पाटील यांच्या प्रचार मेळाव्यात उपस्थित राहून चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दिला. माझी पक्षावर निष्ठा आहे. मला खंजीर खुपसला तरी चालेल. माझा प्राण घेतला तरी चालेल. भाजपचा विजय होणे महत्त्वाचे आहे, असं म्हणत त्या भावनिक झालेल्या पाहायला मिळाल्या.

चंद्रकांत पाटील यांच्या प्रचार मेळाव्यात बोलताना कोथरुडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी भावनिक झाल्या. कुलकर्णी म्हणाल्या, “माझी संघटनेवर निष्ठा आहे. माझ्याबद्दल कुठल्याही वावड्या उठवलेल्या चालणार नाही. मला खंजीर खुपसला तरी चालेल. माझा प्राण घेतला तरी चालेल. भाजपचा विजय होणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी कोणत्या संघटनेने काय भूमिका घेतली, काय वावड्या उठवल्या याच्याशी मी सहमत नाही.”

थोडं दुःख होऊ शकतं. मीही माणूस आहे. मी राजकारणात असले तरी मला संवेदना आणि भावना आहेत. एक स्त्री म्हणून पुरुषाप्रमाणे मला कठोर होता येत नाही. त्यावेळी मी भावना व्यक्त केली, असंही मत कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.

मेधा कुलकर्णी चंद्रकांत पाटलांना उद्देशून म्हणाल्या, “मी जेव्हा भाजपच्या कामाला सुरुवात केली तेव्हा माझी मुलं तान्ही होती. मी त्यांना घरात सोडून काम केलं. मला माहिती त्यांनी त्यांचे वाढदिवस कसे साजरे केले. मला माहित नाही ते कधी आजारी पडले आणि बरे झाले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोणी नेलं हेही मला माहिती नाही. मी त्यांच्या शिक्षणावर लक्ष देऊ शकले नाही. मी केवळ माझा वॉर्ड आणि मतदारसंघ यासाठी काम केलं.”

मेधा कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटलांना आपल्या घरीही येण्याचं आमंत्रण दिलं. यावेळी मेळाव्याला कसब्याच्या उमेदवार मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार, मुरलीधर मोहोळ हेही उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या हा पहिला प्रचार मेळावा कोथरुड येथील आशिष गार्डनमध्ये पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांनी “चंद्रकांत दादा आगे बढो”च्या घोषणाही दिल्या. मेधा कुलकर्णींनी चंद्रकांत पाटलांना कोथरुड मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून देण्याचं आश्वासनही दिलं.

दरम्यान, कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात (Chandrakant Patil Kothrud) इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही. भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही, तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI