ए. टी. पाटील गप्प राहा, मी बोललो तर पंचाईत होईल : गिरीश महाजन

ए. टी. पाटील गप्प राहा, मी बोललो तर पंचाईत होईल : गिरीश महाजन

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपमधील विजयी उमेदवारांचा आकडा हा सरप्राईज असेल, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुभाष भामरे हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी मालेगावात महायुतीचा  कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गिरीश महाजन यांनी येत्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे, गिरीश महाजनांनी माझा घात केला, असा आरोप करणाऱ्या जळगावच्या विद्यमान खासदारांनी गप्प राहावं, असा दमही महाजनांनी दिला.

“लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून यावेळी विजयी होणाऱ्या भाजप उमेदवारांचा आकडा हा सरप्राईज असेल”, असे महाजन म्हणाले. तसेच “दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडून येणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी चर्चा केली, त्यामुळे आता ते नाराज नाहीत”, असंही महाजनांनी या मेळाव्यात सांगितलं. भाजपने दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. या मेळाव्यात गिरीश महाजनांसोबत पर्यटन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री दादा भुसेही उपस्थित होते.

‘गिरीश महाजन यांनी माझा घात केला’, असा आरोप त्यांच्याच पक्षातील जळगावचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांनी महाजनांवर केला होता. यानंतर महाजनांनी ए.टी. पाटील यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला. “मी बोललो तर त्यांची पंचाईत होईल”, असा दम महाजनांनी ए.टी. पाटलांना दिला.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपकडून ऑफर असल्याचा दावा सुशिलकुमार शिंदेंनी केला होता. यावर ज्यांनी शिंदेंना ऑफर दिली होती, शिंदेंनी त्यांचं नाव सांगावं, असा सरळ प्रश्न महाजनांनी शिंदेंना केला.