क्लास टीचर ते केंद्रीय मंत्री, अरविंद सावंत यांची धगधगती कारकीर्द

लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून भाजपप्रणित एनडीए पुन्हा सत्तेत आली. या नव्या सत्तेची सुरुवात आजपासून होणार आहे. आज नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची, तर त्यांचे सहकारी नेते मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद हे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अरविंद सावंत हे सलग दोनवेळा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले. 2014 आणि 2019 …

क्लास टीचर ते केंद्रीय मंत्री, अरविंद सावंत यांची धगधगती कारकीर्द

लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून भाजपप्रणित एनडीए पुन्हा सत्तेत आली. या नव्या सत्तेची सुरुवात आजपासून होणार आहे. आज नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची, तर त्यांचे सहकारी नेते मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद हे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

अरविंद सावंत हे सलग दोनवेळा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले. 2014 आणि 2019 साली अशा सलग दोनवेळा सावंत यांनी काँग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा यांचा पराभव केला. दस्तुरखुद्द उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला होता. मात्र, अंबानींनी पाठिंबा दिलेल्या देवारांना सावंतांनी पराभवाची धूळ चारली आणि दक्षिण मुंबईत शिवसेनेचा भगवा फडकवला.

लढवय्या!

कट्टर… निष्ठावंत… एकनिष्ठ… तत्त्वनिष्ठ… अभ्यासू नेता… लढवय्या राजकारणी… अशा असंख्य बिरुदावल्या आपल्या खांद्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या अरविंद सावंत यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. अरविंद सावंत यांना केंद्रात मंत्रिपद काही सहजासहजी मिळालं नाही. त्यामागे अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. पक्षाशी आणि पक्ष नेतृत्त्वाशी एकनिष्ठता आहे. नुसते शिवसैनिक म्हणून नव्हे, तर ‘बाळासाहेंबांचा शिवसैनिक’ अशी खास ओळख अरविंद सावंत यांची आहे.

बाळासाहेबांचा दूत

सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून सार्वजनिक आयुष्यात पाऊल ठेवणाऱ्या अरविंद सावंत यांना पहिलं पद मिळंल ते गटप्रमुखाचं. 1968 साली गटप्रमुख म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या अरविंद सावंत यांनी सीमा आंदोलनात 1969 साली महत्वाची भूमिका बजावली होती. संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी राज्याचा कोपरा नि कोपरा पिंजून काढला. ‘बाळासाहेबांचा दूत’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

क्लास टीचर अरविंद सावंत

प्राचार्य वामनराव महाडिक यांच्या क्लासेसमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना अरविंद सावंत शिकवत असत. त्याचसोबत, ठाणे जिल्ह्यातील (आताच्या पालघर जिल्ह्यातील) मोखाडा, जव्हार इत्यादी आदिवासी पाड्यात जाऊन विविध सामाजिक उपक्रम राबवत असत.

MTNL चे कामगार नेते

जवळपास 30 वर्षे महानगर टेलिफोन निगम (MTNL) कामगार संघाचे अध्यक्षपद अरविंद सावंत यांनी भूषवलं आणि त्यामुळेच उत्तम कामगार नेता म्हणून त्यांचा ‘सर्वोत्कृष्ट युनियन लीडर’ पुरस्काराने गौरवही झाला.

संसदपटू : अरविंद सावंत

अभ्यासू आणि दांडगा व्यासंग असणाऱ्या अरविंद सावंत यांना साहित्य, कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण या सर्वच  क्षेत्रांची विशेष आवड आहे. समस्या कोणतीही असो, मुद्दा कोणाताही असो, विषय कोणताही असो… अरविंद सावंत त्यावर बोलणार म्हटल्यावर ऐकणारेही कानाचे डोळे करुन सरसावून बसतात. 2014 साली पहिल्यांदा संसदेत गेले आणि अवघी संसद दणाणूण सोडली.

अभ्यासू नेता

लोकसभेच्या सभागृहात ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशी घोषणा देत, अवघं सभागृह दणाणून सोडणाऱ्या अरविंद सावंत यांनीच डॉ. झाकिर नाईकवर बंदीची ठाम मागणी केली. कुठल्याही विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करणं ही अरविंद सावंत यांची खासियत मानली जाते. बॉम्बे हायकोर्टाचं मुंबई हायकोर्ट नामांतराचा मुद्दा असो वा एलफिन्स्टनचं प्रभादेवी करणं असो, अरविंद सावंत यांनी प्रत्येक मुद्दा कसोशीने लावून धरल्याचं पाहायला मिळालं.

…आणि खासदार झाले!

अरविंद सावंत सलग दोनवेळा खासदार झालेत. पहिल्यांदा 2014 साली दक्षिण मुंबईतून खासदार म्हणून विजयी झाले. काँग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा यांचा तब्बल 1 लाख 28 हजार मतांनी पराभव केला. त्यावेळी त्यांना ‘जायन्ट किलर’ म्हणून संबोधले गेले. त्यानंतर पुन्हा 2019 साली म्हणजे यंदा अरविंद सावंत यांनी काँग्रेसच्याच मिलिंद देवरा यांचा पराभव केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *