मुख्यमंत्र्यांचा मेगाप्लॅन, मुंबईतूनही विधानसभा लढवण्याची शक्यता

सचिन पाटील

|

Updated on: Jul 19, 2019 | 10:07 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नवं राजकीय गणित मांडण्याच्या तयारीत आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री दोन मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांचा मेगाप्लॅन, मुंबईतूनही विधानसभा लढवण्याची शक्यता

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय आश्चर्य पाहायला मिळत आहेत. आज एका पक्षात असलेले आमदार उद्या कोणत्या पक्षात असतील हे सांगता येत नाही. तसंच आज एका मतदारसंघातून निवडणूक लढवणारे उद्या दुसऱ्या मतदारसंघातून रिंगणात उतरल्यास आश्चर्य वाटायला नको. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नवं राजकीय गणित मांडण्याच्या तयारीत आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री दोन मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री त्यांच्या नागपूर दक्षिण- पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेतच, शिवाय त्यांच्यासाठी मुंबईतील मतदारसंघाचीही चाचपणी सुरु आहे.  मुंबईतील मलबार हिल किंवा मुलुंड यापैकी एक मतदारसंघ मुख्यमंत्री निवडू शकतात. विदर्भाऐवजी महाराष्ट्राचा नेता अशी छबी निर्माण करण्याचा यावरुन प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. नागपूरच्या पारंपारिक मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांना निवडणूक लढवण्यास काहीही अडचण नाही. मात्र ते मुंबईतील कोणता मतदारसंघ निवडतात हे पाहावं लागेल. मुख्यमंत्र्यांसाठी मुंबईतील मलबार हिल हा मतदारसंघ सुरक्षित मानला जात आहे. या मतदारसंघाचं नेतृत्व सध्या मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा करत आहेत.

जर मुख्यमंत्र्यांना मुंबईतून निवडून आणायचं असेल, तर त्यांना मलबार हिल मतदारसंघातूनच रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत मंगल प्रभात लोढा यांचं पुनर्वसन कुठे करणार हे पाहावं लागेल.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होऊ शकतात. ऑक्टोबर महिन्यात विद्यमान सभागृहाचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार हे निश्चित आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री दोन मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे तयारी

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचीही तयारी सुरु झाली आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरु आहे. शिवसेनेनेही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तर भाजपही मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. एकीकडे शिवसेनेची जन आशीर्वाद यात्रा सुरु असताना, भाजपही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात विकास यात्रा काढणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI