आघाडी सरकारच्या विनाशी कारभारामुळे राज्य आर्थिक अधोगतीकडे, अतुल भातखळकरांचा घणाघात

उद्योगधंदे अन्य राज्यात स्थलांतरीत होऊ लागले आहेत. याचाच परिणाम राज्याच्या जीएसटी उत्पन्नात मोठी घट होण्यात झाला आहे. आघाडी सरकारचा विनाशी कारभार असाच चालू राहिला तर राज्य आर्थिक अधोगतीकडे जाईल, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शुक्रवारी केली.

आघाडी सरकारच्या विनाशी कारभारामुळे राज्य आर्थिक अधोगतीकडे, अतुल भातखळकरांचा घणाघात
अतुल भातखळकर, आमदार, भाजप


मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योजकांना खंडणीसाठी मारहाण करणे, धमक्या देणे असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. त्यामुळे उद्योगधंदे अन्य राज्यात स्थलांतरीत होऊ लागले आहेत. याचाच परिणाम राज्याच्या जीएसटी उत्पन्नात मोठी घट होण्यात झाला आहे. आघाडी सरकारचा विनाशी कारभार असाच चालू राहिला तर राज्य आर्थिक अधोगतीकडे जाईल, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Atul Bhatkhalkar criticizes Mahavikas Aghadi government from industry sector)

ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्राच्या उत्पन्नात जुलैच्या तुलनेत 3 हजार 728 कोटींची घट झाल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांच्या जीएसटी उत्पन्नात ऑगस्टमध्ये वाढ झाली असताना महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या उत्पन्नात एवढी मोठी घट होणे चिंताजनक आहे. ज्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात सर्वात मोठी आहे, अशा राज्याच्या उत्पन्नात घट होण्यास आघाडी सरकारचा कारभार जबाबदार आहे, अशी टीका भातखळकरांनी केलीय. सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने उद्योजकांना खंडणीसाठी धमकावले जात असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळविले होते. राष्ट्रीय महामार्गाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना शिवसेना आमदारांकडून धमकावले जात असल्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी याची दाखल न घेतल्याने खंडणीखोर मोकाट सुटले आहेत, असा आरोपही भातखळकर यांनी यावेळी केलाय.

उद्योगस्नेही मानकात महाराष्ट्र 13व्या स्थानावर!

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्योगस्नेही ( इज ऑफ डुईंग बिझनेस ) मानकात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर होता. मात्र आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचे स्थान 13 व्या क्रमांकापर्यंत घसरले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार तिसरी लाट, टाळेबंदीची भीती दाखवत असल्याने उद्योजक, उद्योगपतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असंही भातखळकर यांनी म्हटलंय.

आघाडी सरकारला धार्मिक स्थळांचं वावडं का?

महाविकास आघाडी सरकारविरोधात 30 ऑगस्ट रोजी भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली पश्चिम येथे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु आंदोलन स्थळी पोहोचण्यापूर्वीच भातखळकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. राज्यातील बार, दारूची दुकाने, मॉल सुरू करणाऱ्या मात्र कोरोनाचे कारण पुढे करत मंदिरे उघडण्यास टाळाटाळ करणाऱ्या हिंदूविरोधी ठाकरे सरकारच्या विरोधात हे आंदोलन असल्याचं त्यावेळी भाजपकडून सांगण्यात आलं होतं.

कोरोना महामारीमुळे वर्षभरापासून राज्यातील मंदिरांचे दरवाजे बंद आहेत. रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील सर्व निर्बंध शिथिल केले, मात्र, मंदिरं बंदच ठेवली. करोडो हिंदू भाविकांच्या श्रद्धेसोबतच मंदिरावर उपजीविका अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. बार चालकांना करात सवलत देणाऱ्या ठाकरे सरकारने मंदिरावर उपजीविका अवलंबून असलेल्या सर्वसामान्यांना कोणतीही मदत दिली नाही, असा आरोप भातखळकर यांनी केला होता.

इतर बातम्या :

OBC Reservation : ओबीसींवर सर्वपक्षीय बैठक संपली, फडणवीसांचा 3 प्रमुख मुद्यांवर भर, सरकारचीही सहमती?

OBC Reservation : ‘चोराच्या उलट्या बोंबा’ अशी विरोधी पक्षनेत्यांची स्थिती, नाना पटोलेंचा आरोप

Atul Bhatkhalkar criticizes Mahavikas Aghadi government from industry sector

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI