
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याआधी अनेकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक कार्यक्रम आणि मोर्चानिमित्त एकाच मंचावर आल्याचे पहायला मिळाले आहे. या युतीमुळे महायुतीची चिंता वाढण्याची शक्यता आहे. मात्र आता या दोन्ही नेत्यांच्या युतीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रामदास आठवले यांनी या दोन्ही नेत्यांच्या युतीवर भाष्य करताना म्हटले की, ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने आमची महायुती अधिक मजबूत आहे. हे दोघे एकत्र आल्याने महाविकास आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेस त्यांच्या सोबत यायला तयार नाही. त्यामुळे सगळी जी परिस्थिती आहे ती आमच्या बाजूने आहे. 40 टक्के मराठी मतदान त्यापैकी 20-22 टक्के मतदान आमच्या बाजूने होईल, 60 टक्के अमराठी मतदान आमच्या सोबत राहील. राज ठाकरे यांच्यात सभेला गर्दी करण्याची कुवत आहे, मात्र मतदान मिळवण्याची कुवत नाही. मुंबईत कौल त्यांच्या बाजूने जाणार नाही. मुंबईत महायुतीचा झेंडा फडकेल.’
मतदार याद्यांमधील घोळाबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मत चोरी ही आज होते असे नाही. मतचोरी अनेक वर्षांपासून होते, तरी मतचोरी होऊ नये अशी माझी इच्छा आहे. सत्याचा मोर्चा जरी काढला असला तरी या याद्या अगोदर पासून आहेत, काँग्रेसचे सरकार असल्यापासून मतदार याद्या आहेत. त्यांनी इलेक्शन कमिशन कडे तक्रार करावी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे , शरद पवार व काँग्रेस पक्ष, शेकाप हे सगळे लक्ष एकत्र आले होते. त्यांनी या तक्रारी निवडणूक आयोगापुढे मांडायला हरकत नाही.’
पुढे बोलताना आठवले म्हणाले की, ‘तुमची सत्ता आल्यानंतर मतांची चोरी झाल्याचा आरोप आम्ही केला नाही. आमची सत्ता आल्यानंतर आपण सांगता मतचोरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. मुंबई सारख शहर बदलत चाललं आहे, मतचोरी होऊ नये ही आमची भूमिका आहे, सत्याच्या मोर्चात दिलेल्या पुराव्यावर मत चोरी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशनने खबरदारी घेऊन कार्यवाही करावी.’