
मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीची युती कायम राहणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी काँग्रेसने केली होती. परंतु आता आघाडीचे संकेत मिळत आहेत. मात्र आघाडी झाल्यास आपले उमेदवार दोनही घटक पक्षांकडून पळवले जातील, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळेच आघाडी झाल्यास आमच्या एकाही उमेदवाराला तुम्ही पक्षात प्रवेश देणार नाहीत, किंवा आयारामांना तिकीट मिळू नये असा करार करण्याची मागणी काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाला रोखायचे असल्यास महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतला आहे. मात्र जर जागा वाटपात अन्याय होणार नसेल, सन्मानाने जागा मिळणार असतील तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहे. मात्र जागा वाटपात अन्याय होणार असेल तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढू शकतो, असा इशारा काँग्रेसच्या काही नेत्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी करणार का हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दुसरीकडे महापालिका निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेसोबत आघाडी करणार का, या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे की, मी वैयक्तीक पातळीवर शिवसेनेसोबत युती करण्यास उत्सुक नाही. शिवसेनेची आणि काँग्रेसची कार्यपद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे पुढे चालून मतभेद होऊ शकतात. मात्र आघाडीबाबत अंतिम निर्णय हा पक्षाचा असेल.
दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत युती करण्याची दाट शक्यता असल्याचे राजकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र युती करत असताना अधिकाधिक जागा आपल्या पदरात कशा पाडून घेता येतील यावर काँग्रेसचा भर असेल. त्यासाठी ते स्वबळाच्या अस्त्राचा उपयोग करू शकतात. दुसरीकडे शिवसेनेने महापालिका निवडणूक स्वबळावर लढवल्यास त्यांच्या पुढे भाजपाचे प्रमुख आव्हान असेल. अशा परिस्थितीमध्ये त्यांना फटका बसू शकतो, त्यामुळे ते आघाडी करण्यासाठी उत्सूक असतील. किंवा शेवटपर्यंत आघाडी झालीच नाही, तर सर्व पक्षा स्वबळावर लढून निवडूण आल्यानंतर पुन्हा एकत्र येऊ शकतात असा अंदाज राजकीय वर्तृळातून व्यक्त केला जात आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाल्यास जे उमेदवार तिकिटाच्या प्रतिक्षेत आहेत, त्यांच्या नाराजीचा फटका आघाडीला बसू शकतो. त्यामुळे अशा नाराज कार्यकर्त्यांची समजून घालण्याचे मोठे आव्हान तीनही घटक पक्षांपुढे असणार आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी इतर पक्षातून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या उमेदवाराला तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे.
ममता बॅनर्जींचा पॉलिटिकल स्ट्राईक, काँग्रेसचे 12 आमदार तृणमूलमध्ये, मेघालयात TMC प्रमुख विरोधी पक्ष
Election 2022: भाजप 26 नोव्हेंबरपासून देशभर संविधान गौरव अभियान राबवणार