‘मुलांना जिंकवण्याच्या नादात नेत्यांनी काँग्रेसला हरवले’

‘मुलांना जिंकवण्याच्या नादात नेत्यांनी काँग्रेसला हरवले’


नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आक्रमक भूमिका घेत काँग्रेसच्या नेत्यांना फैलावर घेतले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या मुलांना जिंकवण्याच्या नादातच काँग्रसचा पराभव झाल्याचे स्पष्ट मत राहुल गांधींनी व्यक्त केले. यातून त्यांनी पक्षांतर्गत मोठ्या बदलांचेही संकेत दिले आहे. शनिवारी काँग्रेस वर्किंग कमेटीची बैठक झाली. त्यात राहुल गांधींचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्यानंतर राहुल गांधींच्या या प्रतिक्रियेने काँग्रेसच्या अंतर्गत गोटात चांगलीच खळबळ माजली आहे.

राहुल गांधींनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर त्यांच्या मुलांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यासाठी दबाव तयार केल्याचाही आरोप केला. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना तयार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राहुल गांधींनी ही भूमिका स्पष्ट केली.

ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, अशा राज्यांमध्येही काँग्रेसची कामगिरी खराब राहिल्याचाही मुद्दा राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केला. तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत, कमलनाथ आणि पी. चिदंबरम यांनी आपल्या मुलांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी आपण त्यांच्या उमेदवारीशी सहमत नव्हतो, असेही राहुल गांधींनी नमूद केले.

आपली नाराजी व्यक्त करताना राहुल गांधींनी पक्षातील नेत्यांवर आरोप केला, की भाजप आणि मोदींविरोधात ज्या मुद्द्यांचा आक्रमकपणे उपयोग करता आला असता अशा मुद्द्यावरही पक्षातील नेत्यांनी हलगर्जीपणा दाखवला. याद्वारे त्यांनी सुचकपणे राफेल प्रकरण देशपातळीवर नेण्यात पक्षाचे कार्यकर्ते अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

संबंधित बातम्या : 

माजी पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ते माजी मुख्यमंत्री, दिग्गजांचा पराभव