2 हजार रुपये घ्या आणि भाजप सोडून कुणालाही मत द्या, शेतकऱ्याचं सुजय विखेंना सडेतोड उत्तर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) प्रचार अगदी शिगेला पोहचला आहे.

2 हजार रुपये घ्या आणि भाजप सोडून कुणालाही मत द्या, शेतकऱ्याचं सुजय विखेंना सडेतोड उत्तर

अहमदनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) प्रचार अगदी शिगेला पोहचला आहे. अशा वातावरणात अनेक नेते मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी आक्रमक भाषणं करत विरोधकांवर तुटून पडत आहेत. मात्र, यात अनेक नेत्यांचा तोलही ढळत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे खासदार सुजय विखे यांच्याबाबतही (Controversial Statement of Sujay Vikhe) असाच काहीसा प्रकार घडला. यावर शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विखेंना उत्तर देताना एका शेतकऱ्यांने त्यांना थेट 2 हजार रुपयांचा चेक पाठवत भाजप सोडून कुणालाही मतदान करण्यास सांगितलं आहे.

सुजय विखेंनी कर्जत-जामखेड येथे भाजप नेते राम शिंदे यांच्या प्रचारसभेत भाजपला मत न देणाऱ्यांनी शेतकरी विम्याचे खात्यावर जमा झालेले 2 हजार रुपये परत करण्याचं अजब वक्तव्य केलं होतं. रोहित पवारांच्या सभेला जाणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेचे 2 हजार रुपये चालतात, मग मोदींचं कमळ का चालत नाही? असा प्रश्न विखेंनी केला होता.

विखेंच्या या वक्तव्यावर संगमनेर येथील शेतकरी आणि छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष दत्ता ढगे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. दत्ता ढगे म्हणाले, “शेतकऱ्यांची किंमत 2 हजार रुपये ठरवणाऱ्या सुजय विखेंना हे माहित असावं की आपण लोकशाहीत राहतो. लोकशाहीत सर्वांच्या मताला सारखीच किंमत आहे. आमच्या मताची किंमत 2 हजार रुपये ठरवून तुम्ही आमचा जो अपमान केला आहे, तो कधीच क्षमा करण्यासारखा नाही. परंतू जर तुमच्याही मताची किंमत 2 हजार रुपये असेल, तर आम्ही तुम्हाला रजिस्टर पोस्टाने 2 हजार रुपयांचा चेक पाठवत आहोत. तो चेक घेऊन लोणीत आपण कमळ या चिन्हाला सोडून कुणालाही मतदान करावं. यावेळी कमळ चिन्हावर तुमचे वडील राधकृष्ण विखे उभे आहेत हेही लक्षात असू द्यावं.”

 

दत्ता ढगे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मताची किंमत करणाऱ्या, आपले मत विकू पाहणाऱ्या सुजय विखेंसारख्या प्रवृत्तीला सडोतोड उत्तर द्यावं. शेतकऱ्यांनी सुजय विखेंना 2 हजार रुपये देत त्यांच्याही मताची किंमत करावी आणि त्यांचे वडील राधाकृष्ण विखेंसह राम शिंदे आणि भाजपच्या इतर उमेदवारांना मतदान नाकारावं, असं आवाहन ढगे यांनी केलं आहे.

सुजय विखे काय म्हणाले होते?

सुजय विखे म्हणाले होते, “रोहित पवारांना अनेक युवक जाऊन पाठिंबा देत आहेत. त्यामुळे तुम्ही गोंधळून जावू नका. राम शिंदे तुम्ही रोहित पवारांच्या सभेला जाणाऱ्या लोकांची यादी काढा. याच लोकांच्या खात्यावर सरकारने 2 हजार रुपये टाकलेले आहेत. यांना मोदींचे 2 हजार रुपये चालतात. मग कमळ का चालत नाही. अशा शेतकऱ्यांनी 2 हजार नको असतील, तर घेऊ नका. ते 2 हजार रुपये आम्ही गरीब जनतेसाठी वापरू.”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI