मुंबई : बुधवारी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे (LPG gas cylinder) दर पुन्हा एकदा 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. यावरून शिवसेनेचे (shiv sena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. केंद्रातील राज्यकर्ते सध्या राज्या-राज्यांतील विरोधकांची सरकारे अस्थिर करण्यात मग्न आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे (Inflation)’चिंतामग्न’ झालेल्या सामान्य माणसाची काळजी वगैरे करण्याशी त्यांचा संबंध राहिलेला नाही. देशातील महागाईने मागील आठ वर्षांतील उच्चांक तर गाठलाच आहे, पण त्या उच्चांकात भरच घालण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर बुधवारी 50 रुपयांनी महाग झाले. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत मुंबईमध्ये 1 हजार 52 रुपयांच्या वर गेली आहे. गेल्या वर्षभरात घरगुती सिलिंडरच्या किंमती 834.50 रुपयांवरून 1052 रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. म्हणजे एका वर्षात तब्बल 218.50 रुपयांचा वाढीव बोजा प्रत्येक कुटुंबाच्या बजेटवर पडला आहे. आता पुन्हा एकदा गॅस सिलिंडर महाग झाल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे.