
Ajit Pawar On Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांच्या जवळचा सहकारी वाल्मिक कराड याचे नाव आल्यानंतर मुंडे यांनी आपल्या कृषिमंत्रिपदारा राजीनामा दिला. हा राजीनामा देताना त्यांनी प्रकृतीचे कारण दिले होते. मात्र त्यांना आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संकेत दिले आहेत. अजित पवार यांच्या याच संकेतांनंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या. मुंडेंना परत मंत्रिमंडळात घेण्याची घाई केली जात आहे, असे म्हणत विरोधकांनी अजितदादांवर टीका केली. त्यानंतर आता धनंजय मुंडे आणि मंत्रिपद यावर केलेल्या विधानसंदर्भात अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
मी काल मराठी भाषेत सांगितलं की धनंजय मुंडे यांच्याविरोधात कोणीतरी मुंबई उच्च न्यायालयात गेलं होतं. तिथं त्यांना कृषी क्षेत्रातील आरोपांबाबत क्लिनचीट देण्यात आलेली आहे. इतर बाबतीत अजून न्यायालयीन चौकशी चालू आहे. या चौकशीचा अहवाल आलेला नाही. भविष्यात या चौकशीचे अहवाल चांगले आहे तरच आम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्याबाबत विचार करू, असे मी बोलल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.
तसेच पुढे बोलताना, एखाद्या व्यक्तीवर आरोप केले जात असतील आणि चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्ती दोषी नाही असे समोर आले तर पुन्हा संधी दिली पाहिजे असे, असं मतही अजित पवार यांनी व्यक्त केलं.
धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना क्लीनचीट दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अजित पवार यांनी एक विधान केले होते. धनंजय मुंडे यांना क्लीनचीट देण्यात आली आहे. त्यांच्यासंदर्भात आणखी एक गोष्ट आहे. त्यावरही पोलीस यंत्रणा कारवाई करत आहे. दुसऱ्या प्रकरणातही क्लीनचीट मिळाली तर आम्ही धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देऊ, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं होतं. अजितदादांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता.