शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष, सत्तेत असताना सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका : देवेंद्र फडणवीस

शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis On Agriculture Bills) 

शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष, सत्तेत असताना सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका : देवेंद्र फडणवीस

नागपूर : “शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. ते लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतात. आमच्यासोबत जेव्हा सत्तेत होते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका त्यांनी घेतल्या. शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही,” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis On Agriculture Bills)

“केंद्राने मंजुरी दिलेल्या कृषी विधेयकाला मुळात शेतकर्‍यांचा या विधेयकांना विरोध नाही. त्यांनी तर स्वागतच केले आहे. मात्र काही नेते केवळ आपली दुकानदारी चालविण्यासाठी याचा विरोध करीत आहेत,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2019 चा आपल्या स्वत:च्याच काँग्रेस पक्षाचा वचननामा पाहिला, तर त्यांनी या विधेयकाला विरोध केला नसता,” अशी खोचक टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“काल जी विधेयके राज्यसभेने मंजूर केली, ती ऐतिहासिक आहेत. शेतकर्‍यांच्या आयुष्यात क्रांती करणारी आहेत. ‘एक देश-एक बाजार’ यामुळे आता शक्य होणार आहे. शेतकर्‍याने आपला माल कुठे विकायचा, याची मुभा त्याला मिळणार आहे. या विधेयकामुळे आंतरराज्यीय विक्री सोपी होणार आहे. आपण राज्यात जेव्हा असा कायदा केला, तेव्हा मोठ्या प्रमाणात बाजारांची निर्मिती आणि तेथे शेतकरी थेट विक्री करतो आहे, हे पाहिले आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis On Agriculture Bills)

“एमएसपी बंद होणार नाही”

“या कायद्यांमुळे आता शेतकर्‍यांना एमएसपी मिळणार नाही, असा अपप्रचार केला जात आहे. पण, एमएसपी कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे. कंत्राटी शेतीसंदर्भात 2006 मध्ये महाराष्ट्रात आघाडी सरकारने कायदा केला. त्याचा फायदा महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळे आता त्यालाच संसदेत विरोध ही शुद्ध लबाडी आहे,” असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

“शेतकर्‍यांबद्दल काँग्रेस आणि या विधेयकांना विरोध करणारे पक्ष केवळ राजकारण करीत आहेत. शेतकर्‍यांची दिशाभूल करीत आहेत. 2019 च्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सुद्धा याच सार्‍यांचे आश्वासन देण्यात आले होते. आता केवळ राजकारणासाठी विरोध सुरु आहे.”

“केवळ विरोधासाठी विरोध केला जातोय”

“हा मुद्दा आमच्यासाठी राजकारणाचा नाही. शेतकर्‍यांचे शोषण थांबविणे, याला आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. यावर गेल्या 10 वर्षांपासून सकारात्मक चर्चा झाली आहे. पण, सध्या केवळ विरोधासाठी विरोध केला जात आहे,” असेही फडणवीस म्हणाले.

“नीती आयोगाने शेती सुधारणांसाठी माझ्या अध्यक्षतेत मुख्यमंत्र्यांचा एक टास्क फोर्स गठीत केला होता. मध्यप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री कमलनाथ, कर्नाटकचे तत्कालिन मुख्यमंत्री हे या टास्कफोर्समध्ये होते. तेव्हा सर्वांनी हीच मागणी केली होती. डॉ. स्वामिनाथन आयोगाने अशाच प्रकारच्या शिफारसी केल्या होत्या. हा आयोग पूर्णपणे लागू करण्याचे काम केवळ मोदी सरकार करीत आहे. त्यामुळेच जनता आणि शेतकरी हा मोदी सरकारसोबत आहे. कंत्राटी शेतीसंदर्भातील तरतुदींमुळे शेतकर्‍यांच्या जमिनीची मालकी सुरक्षित राहील. अधिक नफा झाला, तर त्यातील वाटा शेतकर्‍याला द्यावा लागेल,” असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले. (Devendra Fadnavis On Agriculture Bills)

संबंधित बातम्या : 

तृणमूल खासदाराने नियम पुस्तक फाडले, वेलमध्ये काँग्रेस-आपचा गोंधळ, राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर

ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली?, भाजपचा गृहमंत्र्यांना सवाल

Published On - 3:09 pm, Mon, 21 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI