सध्या एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा अशी परिस्थिती : देवेंद्र फडणवीस

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कामावर जोरदार टीकास्त्र सोडलं. सध्या एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा अशी परिस्थिती तयार झाल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं (Devendra Fadnavis on Maha Vikas Aghadi Government).

सध्या एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा अशी परिस्थिती : देवेंद्र फडणवीस

पंढरपूर : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कामावर जोरदार टीकास्त्र सोडलं. सध्या एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा अशी परिस्थिती तयार झाल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं (Devendra Fadnavis on Maha Vikas Aghadi Government). ते पंढरपूरमधील अकलूज येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते. फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करुन केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये दुष्काळ संपवायचा असेल, तर पाण्याचा थेंब न थेंब अडवला पाहिजे. यासाठी आमच्या सरकारनं जलयुक्त शिवार, जलसंधारणाची कामं सुरू केली. या कामांमध्ये लोकांनी लोकसहभाग दिला. परंतु सध्या पाणी आडवा आणि पाणी जिरवा ऐवजी एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा अशी परिस्थिती आहे.”

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा झाला. त्यांचं उत्पादन वाढलं. आता नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी जुन्या सरकारनं केलेली कामं थांबवणं सुरु केलं. तुम्ही या योजना थांबऊ शकता, पण लोकांचा सहभाग कसा थांबवणार? हे काम लोकांनी हातात घेतलं आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

‘आघाडीचा समान कार्यक्रम सत्तेवर बसणं आणि भाजपला संपवणं’

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सरकारच्या सहकार क्षेत्रातील धोरणावरही टीका केली. ते म्हणाले, “अनेक कारखाने अडचणीत आले आहेत. कोणालाही लक्ष देण्यास फुरसत नाही. त्यांचा किमान समान कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी नाही. गोरगरिबांसाठी नाही किंवा बेरोजगारीसाठी नाही. त्यांचा किमान कार्यक्रम केवळ सत्तेवर बसणे आणि भाजपला संपवणे हाच आहे.”

कर्जमाफीच्या मुद्द्यावर या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याची मालिका सुरु केली आहे. कुठल्याही सत्तेपेक्षा तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी महत्वाचा आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरण हा मुद्दाही आमच्यासाठी महत्वाचा आहे. आमचं सरकार असतं, तर हे काम लवकर झालं असतं. पंतप्रधान मोदींनी माढाचा जल शक्ती मंत्रालायमध्ये समावेश केला असून यासाठी मोठा निधी दिला आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

“शंकरराव मोहितेंनी सहकार महाराष्ट्रात रुजवला”

फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या बोटावर मोजण्या इतक्या नावांमध्ये शंकरराव मोहिते पाटील याचं नाव आहे. त्यांनी सहकार संपूर्ण महाराष्ट्रात रुजवला. त्यांनी केलेलं काम महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे.”

आमच्या काळात 5 वर्ष एफआरपी वेळेत देण्याचं काम आम्ही केलं. हे म्हणत होते आम्हाला शेतीतील काय कळतं. मात्र, यांच्या काळात उसाची शेती आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे, असाही आरोप फडणवीसांनी केला.

Published On - 4:48 pm, Sun, 12 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI