2014 आणि 2019 मध्ये मला संधी दिल्याबद्दल आभार, मी पुन्हा येणार, जोमाने काम करणार : देवेंद्र फडणवीस

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला. त्याला 11 आमदारांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्र तोमर यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis BJP legislature party leader) यांच्या नावाची घोषणा केली.

2014 आणि 2019 मध्ये मला संधी दिल्याबद्दल आभार, मी पुन्हा येणार, जोमाने काम करणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : भाजपने आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis BJP legislature party leader) यांची पुन्हा एकदा विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला. त्याला 11 आमदारांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्र तोमर यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis BJP legislature party leader) यांच्या नावाची घोषणा केली.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आभाराचे भाषण करताना, पुढील पाच वर्षांची रणनीती सांगितली. “आपण सर्वांनी विधीमंडळ नेतेपदी माझी निवड केली त्याबद्दल आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासह राज्यात दोन वेळा भाजप मोठा पक्ष झाला. माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला त्यांनी 2014 आणि 2019 साली मला ही जबाबदारी दिली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अमित शहा यांची या निवडणुकीत महत्वाची म्हणजे लिडिंग फ्रॉम द फ्रंटची भूमिका होती.  ही निवडणूक आपण महायुतीमध्ये लढवली, त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो, हा महायुतीचा विजय आहे, महायुतीचंच सरकार पुन्हा स्थापन होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

हा विजय निश्चित मोठा आहे. 1995 पासून कुठल्याही पक्षाला 75 पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत. पण आपण दोन वेळा या जागा मिळवल्या आहेत. महायुतीचे सरकार लवकर स्थापन होणार आहे. त्यामुळे अफवा आणि चर्चांवर विश्वास ठेवू नका. चर्चा या चालू राहिल्या पाहिजेत त्याशिवाय मज्जा येत नाही, अशी कोपरखळी देवेंद्र फडणवीस यांनी लगावली.

दुष्काळमुक्तीचं ध्येय

दुष्काळ मुक्त महाराष्ट्र हे आपलं ब्रीद आहे. प्रत्येक शेतीला पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे.  छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून मी 5 वर्ष राज्य चालवलं, तसंच पुढेही चालवू. संविधानाच्या अनुरूप सरकार चालवणार. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं. आता जवाबदारी वाढली आहे. सर्वात जास्त अनुसूचित जाती जमातीचे आमदार भाजपचे आहेत. सर्वात जास्त महिला आमदार भाजपच्या आहेत. सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी आपली जडण-घडण, गेल्या 5 वर्षात जे काम केलं त्यापेक्षा चांगलं काम पुढील 5 वर्षात करायचं आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी निवडीचा प्रस्ताव
चंद्रकांत पाटील – प्रस्तावक
अनुमोदक
1. सुधीर मुनगंटीवार
2. हरिभाऊ बागडे
3. सुरेश खाडे
4. संजय कुटे
5. राधाकृष्ण विखे पाटील
6. देवयानी फरांदे
7. गणेश नाईक
8. देवराव होळी
9. मंगल प्रभात लोढा
10. शिवेंद्रसिंहराजे भोसले
11. आशिष शेलार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI