‘मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही – देवेंद्र फडणवीस

खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांबाबत एक वक्तव्य केलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊतांना उत्तर दिलंय.

'मातोश्री'ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही 'मातोश्री'वर जाणं बंद केलं नाही - देवेंद्र फडणवीस
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस


राजीव गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्याचबरोबर फडणवीस जळगाव दौऱ्यावर असताना एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानीही गेले. त्यावरुन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.  फडणवीस काल शरद पवार यांना भेटले, एक दिवस ते मातोश्रीवरही येतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. राऊतांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलंय. ‘मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. (Devendra Fadnavis responds to MP Sanjay Raut’s statement over Matoshri)

राजकारणामध्ये कुणीही कुणाचा शत्रू नसतो. फडणवीस काल शरद पवार यांना भेटले, एक दिवस ते मातोश्रीवरही येतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी सकाळी केलं होतं. शरद पवार यांच्यावर नुकत्याच काही शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. त्यातून बरे झाल्यानंतर फडणवीस यांनी 31 मे रोजी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. पण आपण पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटलो. ही एक सदिच्छा भेट होती असं फडणवीस म्हणाले. तसंच फडणवीस काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चहापान केलं. पत्रकारांनी विचारल्यावर रक्षाताई खडसे या भाजपच्या खासदार आहेत. आमच्या खासदारांनी निमंत्रण दिल्यानंतर मी त्यांच्या घरी चहासाठी गेलो. याचा कुणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये, असं फडणवीस म्हणाले.

राऊत-फडणवीसांच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चा

या भेटीगाठींवरुनच संजय राऊत यांनी फडणवीस एक दिवस ‘मातोश्री’वरही येतील असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत फडणवीसांना विचारलं असता. ‘मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. आता राऊत आणि फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. आगामी काळात भाजप नेत्यांसाठी ‘मातोश्री’चे दरवाजे उघडणार का आणि फडणवीस मातोश्रीवर जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संजय राऊत यांच्या वक्तव्याला शेलारांचंही उत्तर

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही उत्तर दिलं आहे. ‘मी सुद्धा संजय राऊतांचं ते वाक्य ऐकलंय, आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं वाक्य म्हणजे आमंत्रणाचा एक प्रकार आहे. आमंत्रण स्वीकारलं आम्ही’, असं आशिष शेलार म्हणाले.

संबंधित बातम्या :

फडणवीस आधी पवारांच्या निवासस्थानी, मग खडसेंच्या घरी, आता मातोश्रीचे निमंत्रण स्वीकारले : आशिष शेलार

‘…तर ते पवारांना ओळखतच नाहीत’, फडणवीस-पवार भेटीवर राऊतांचा रोखठोक अग्रलेख

Devendra Fadnavis responds to MP Sanjay Raut’s statement over Matoshri

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI