पवारांसमोरच अजित दादा म्हणाले, जिंकल्यावर ईव्हीएमवर संशय नाही, मग हरल्यावरच का?

अजित पवार यांनी शरद पवारांसमोरच ईव्हीएमवरील आरोप खोडून काढले. जिंकल्यावर ईव्हीएमवर संशय नसतो, पण पराभवानंतरच का? असा सवाल करत कामाला लागण्याच्या सूचना अजित दादांनी केल्या.

, पवारांसमोरच अजित दादा म्हणाले, जिंकल्यावर ईव्हीएमवर संशय नाही, मग हरल्यावरच का?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीत ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा संशय व्यक्त केला. तर दुसरीकडे अजित पवार यांनी या नेत्यांसमोरच ईव्हीएमवरील आरोप खोडून काढले. जिंकल्यावर ईव्हीएमवर संशय नसतो, पण पराभवानंतरच का? असा सवाल करत कामाला लागण्याच्या सूचना अजित दादांनी केल्या.

लोकसभा निकाल कसा लागला त्याची जास्त चर्चा करत बसू नका. आता विधानसभेला चांगल्या पद्धतीने सामोरं जा. जीवाचं रान करुन पक्षासाठी काम करा. निवडून आले तेव्हा ईव्हीएमला दोष द्यायचा नाही आणि पडल्यावर कसा दोष द्यायचा? पण तोच विषय घेऊन कामात कमी पडू नका, असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचंही अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचं अस्तित्व कायम राहणार आहे, त्यात काही विलिनीकरण होणार नाही . समविचारी पक्षांना बरोबर घेऊन जायची आमची भूमिका आहे. आघाडी सरकार आलं तर सर्व रिक्त सरकारी जागा भरु, असं आश्वासनही अजित पवारांनी दिलं.

शरद पवार काय म्हणाले?

याच कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. ईव्हीएम संदर्भात मी तज्ञांकडून जाणून घेतलं. एव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांच्यात काही गडबड नाही, तर बाजूला बसलेल्या अधिकाऱ्याच्या मशीनमध्ये गडबड आहे. तुम्हाला व्हीव्हीपॅटमध्ये दिलेलं मत दिसतं, पण त्या अधिकाऱ्याकडे काय गेलं हे तुम्हाला काय माहित? आणि मत मोजणीला पुन्हा तेच घेतलं जातं. आम्ही दिल्लीला जाऊन यावर बैठक घेणार आहोत. जर असंच सुरू राहिलं तर लोक कायदा हातात घ्यायला घाबरणार नाहीत, असंही शरद पवार म्हणाले.

धनंजय मुंडेंचाही ईव्हीएमवर संशय

बीडमध्ये धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या पराभवानंतर त्यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. शिवाय या कार्यक्रमातही ईव्हीएमबाबतचा संशय त्यांनी बोलून दाखवला. अनेक ठिकाणचे निकाल कसे लागले कळत नाहीत. अनेक गावात जिथे भाजपला कधीही मतदान मिळत नाही तिथं भाजपला मतदान कसं मिळतं हा प्रश्न आहे. हा विजय भाजपचा नाही, ईव्हीएम छेडछाडीचा विजय आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *