खडसे म्हणाले ‘आता जेवण करुन जा’, फडणवीस म्हणाले ‘नियोजित कार्यक्रम आहेत, पुढे नक्की येतो’!

एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली असता, फडणवीसांचा जळगाव दौरा आणि आपली पवार भेट हा निव्वल योगायोग असल्याचं त्यांनी म्हटलंय.

खडसे म्हणाले 'आता जेवण करुन जा', फडणवीस म्हणाले 'नियोजित कार्यक्रम आहेत, पुढे नक्की येतो'!
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस

मुक्ताईनगर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यावर असताना एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरच्या घरी भेट दिली. तर दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओकवर भेट घेतली. या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. याबाबत एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली असता, फडणवीसांचा जळगाव दौरा आणि आपली पवार भेट हा निव्वल योगायोग असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर आपण फडणवीसांना जेवण करुन जा, अशी विनंती केल्याचंही त्यांनी सांगितलं. (Eknath Khadse on Sharad Pawar’s Meet and Devendra Fadnavis’s visit to Muktainagar)

जळगाव जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसेही उपस्थित होत्या. मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर असताना फडणवीस चहापानासाठी खडसेंच्या नितळीतील घरी गेले. त्यावेळी एकनाथ खडसे उपस्थित नव्हते. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी फडणवीस आणि खडसेंचं बोलणं करुन दिलं.

जेवल्याशिवाय जाऊ नका, खडसेंची आग्रहाची विनंती

एकनाथ खडसे यांनी फोनवर बोलताना ‘मी मुंबईत आहे. आमच्या घरी आपलं स्वागत आहे. पण मी नसलो तरी जेवल्याशिवाय जाऊ नका’, असा आग्रह फडणवीसांना केला. त्यावेळी फडणवीसांनी “नुकसानाची पाहणी करण्यासाठी आपल्या भागात आलोय. माझे पुढचे कार्यक्रम नियोजित आहेत. मात्र, पुढच्यावेळी आलो की नक्की जेवण करेन”, असं सांगितलं. याव्यतिरिक्त आमच्यात काही बोलणं झालं नसल्याचं खडसे म्हणाले. फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुक्ताईनगरला माझ्या घरी येणे आणि मी पवारांना भेटण्यासाठी जाणं हा योगायोग होता. पवार साहेबांची भेट ही नियोजित होती, असंही खडसे म्हणाले.

खडसे – पवार भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 31 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर बुधवारी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनीही पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत होते. फडणवीसांनंतर खडसे यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी या भेटीबाबत बोलताना ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं सांगत, आपण आणि खडसे एकत्र पवारांच्या भेटीला गेलो नव्हतो, असं म्हटलंय.

खडसेंच्या निवासस्थानी चहापान, फडणवीस काय म्हणाले?

खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन चहापानी केल्यानंतर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावेळी रक्षाताई खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात आल्यावर त्यांनी मला चहाचं निमंत्रण दिलं. माझ्या भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या घरी मी चहाला गेलो. त्यामुळे यात कुणीही वावगं समजण्याचं कारण नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीस काल शरद पवारांच्या निवासस्थानी, आज थेट एकनाथ खडसेंच्या घरी!

शरद पवार-देवेंद्र फडणवीस भेटीवरून तर्कवितर्कांना उधाण; नवाब मलिक म्हणतात…

Eknath Khadse on Sharad Pawar’s Meet and Devendra Fadnavis’s visit to Muktainagar

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI