‘कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी जाहीर करावी’, एकनाथ शिंदेंचं आवाहन

राज्यपालांनी 12 आमदारांची यादी जाहीर करावी, असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं (Eknath Shinde appeal to Governor Bhagatsingh

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण
  • Published On - 19:43 PM, 8 Nov 2020
'कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी जाहीर करावी', एकनाथ शिंदेंचं आवाहन

ठाणे : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी (6 नोव्हेंबर) संध्याकाळी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. त्यानंतर दोन दिवस उलटून गेले तरीही राज्यपालांनी अद्याप नावे जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी 12 आमदारांची यादी जाहीर करावी, असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं (Eknath Shinde appeal to Governor Bhagatsingh Koshyari).

एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी संध्याकाळी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता “राज्यपालांची भेट कुणीही घेऊ शकतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली (Eknath Shinde appeal to Governor Bhagatsingh Koshyari).

‘मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारची पूर्ण तयारी’

“मराठा क्रांती मोर्चासोबत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आंदोलन केले. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे. मराठा आरक्षणाला जी अंतरिम स्थगिती दिली आहे, ती उठविली गेली पाहिजे. आरक्षण टिकविण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदनिशी काम करत आहे. त्यासाठी वकिलांची फौज सरकारने उभी केली आहे”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

“मराठा आरक्षण कार्यसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांचा राजीनामा मागून काही लोक राजकारण करत आहेत. त्यांनी राजीनामा मागण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे’, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मेट्रो कारशेडची जागा सरकारचीच

“मेट्रो कारशेडचा फायदा ठाणे, कासारवडवली, मिरा-भाईंदर, गायमुख, कल्याण, भिवंडी शहरांना होणार आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जागा राज्य सराकरची आहे. त्यावर तशा नोंदीही आहेत. या जागेसंदर्भात तत्कालीन महसूल मंत्र्यांकडे जे अपील केले होते. ते फेटाळण्यात आले आहे. राज्य सरकारने त्याठिकाणी मेट्रो कारशेडचे काम सुरु केले आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

संबंधित बातम्या :

विधानपरिषद : राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, शेट्टी, आनंद शिंदेंचं नाव, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे

विधानपरिषद | मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने दिलेली 12 सदस्यांची यादी राज्यपालांना नाकारता येते का?