एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांची पत्नी शिंदे गटात, ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता
प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये उद्धव ठाकरेंकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. नालासोपारा विधानसभेत हितेंद्र ठाकूर विरुद्ध प्रदीप शर्मा अशी लढत झाली होती.

Pradeep Sharma Wife Join Shivsena : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. अनेक पक्षांमध्ये सध्या इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. आता एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे. स्वीकृती शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी स्वीकृती शर्मा यांनी मलबार हिल परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
स्वीकृती शर्मा यांचे पती प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त माजी पोलिस अधिकारी आहेत. एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून त्यांना ओळखले जाते. प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये उद्धव ठाकरेंकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. नालासोपारा विधानसभेत हितेंद्र ठाकूर विरुद्ध प्रदीप शर्मा अशी लढत झाली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. यानंतर अँटिलिया प्रकरणी प्रदीप शर्मा यांचे नाव चर्चेत आले. प्रदीप शर्मा यांच्यावर २००६ मध्ये कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याचा बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.
राजकीय इनिंगसाठी सज्ज
आता प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा राजकीय इनिंगसाठी सज्ज झाल्या आहेत. स्वीकृती शर्मा यांनी शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले. स्वीकृती शर्मा यांनी 50 गाड्या, 25 बसेस आणि 100 हून जास्त बाईक्स घेत शक्तीप्रदर्शन केले.
अंधेरी पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढणार
स्वीकृती शर्मा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर आता त्या आगामी विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याचे बोललं जात आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
