आरोपी क्रमांक 10… धनंजय मुंडेंविरोधात ‘420’चा गुन्हा दाखल

| Updated on: Jun 14, 2019 | 11:49 AM

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशात धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी क्रमांक 10... धनंजय मुंडेंविरोधात 420चा गुन्हा दाखल
Follow us on

औरंगाबाद : बेलखंडी मठाची जमीन प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे  यांच्य अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करा, असे आदेश दिल्यानंतर अखेर आज त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी साडेसात वाजता अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात धनंजय मुंडेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बेलखंडी मठाची जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवर हा गुन्हा दाखल झाला आहे.

यात कलम 420, 468, 465, 464, 471 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 14 आरोपींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात धनंजय मुंडे हे दहाव्या क्रमांकाचे आरोपी आहेत. धनंजय मुंडे यांच्यासह पत्नी राजश्री मुंडे, बहीण प्रेमा केंद्रे, खंदेसमर्थक सूर्यभान नाना आणि वाल्मिक कराड यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आल आहेत.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशात धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद खंडपीठात सुनीवणीदरम्यान काय झालं?

बेलखंडी मठाची जमीन हडपल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबतची सुनावणी सुरु होती.

“सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम देण्यात आली होती. हीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करुन त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. कृषी जमीनही अकृषिक केली.” असा आरोप याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी केला होता.

याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने धंनंजय मुंडेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. हा साखर कारखाना सुरु करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 2006 ते 2010 या कालावधीत शेकडो एकर जमीन विकत घेतली त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून तब्बल 25 कोटी रुपयांचं भागभांडवालही उभं केलं. मात्र कारखाना काही सुरु झाला नाही.

या प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी पूस या गावात असलेल्या बेलखंडी मठाची 25 एकर जमीनही विकत घेतली. ही जमीन बेलखंडी मठाला इनाम दिलेली. जमीन होती आणि त्याचा विक्री व्यवहार होऊ शकत नव्हता याची माहिती असतानाही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन विकत घेण्यात आली आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडले.

पुढे जगमित्र साखर कारखान्याची मान्यता नाकारण्यात आली आणि हा कारखाना सुरु होण्याआधीच बंद पडला. पण त्यानंतरही कारखान्याने जमीन परत केली नाही. तेव्हापासून राजाभाऊ फड हे सामाजिक कार्यकर्ते या प्रकरणात न्यायालयीन लढाई लढत आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी त्यांनी औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावले होते.

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

जमिनींचं खरेदीखत गुन्हा असतो, कारस्थान नाही, धनंजय मुंडेंना धस यांचं उत्तर

जनतेने खेटर हातात घेऊन जागा दाखवली, धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल