धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

"रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण काढल्यानं राजाभाऊ फड यांनी माझ्यावर आरोप केला आहे. यातले याचिकाकर्ता राजा फड हे रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत."

धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद : सरकारी जमीन हडपल्याच्या आरोपाप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

“सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम देण्यात आली होती. हीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करुन त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. कृषी जमीनही अकृषिक केली.” असा आरोप याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी केला होता. त्यावर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली.

यावेळी औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच, तपासी अंमलदार अन्वर यांच्यावर औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले.

मी सुप्रीम कोर्टात दाद मागणार : धनंजय मुंडे

“दर अधिवेशनाला असा आरोप केला जातो. सरकारकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जातोय. मी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही, मी सर्व रितसर परवानगी घेऊन केलंय.” असा दावा धनंजय मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केला. तसेच, औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.

“रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण काढल्यानं राजाभाऊ फड यांनी माझ्यावर आरोप केला आहे. यातले याचिकाकर्ता राजा फड हे रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत.” अशी माहिती धनंजय मुंडे यांनी नमूद केली.

तसेच, धनंजय मुंडे चुकीचं काम करणार नाही, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाला अवघे काही दिवस बाकी असताना, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यावरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिल्याने, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *