वाराणसीतून मोदींविरोधात हार्दिक पटेल मैदानात?

वाराणसीतून मोदींविरोधात हार्दिक पटेल मैदानात?

नवी दिल्ली : केंद्रात सत्ता मिळवण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. कारण, तब्बल 80 जागा या राज्यात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः वाराणसी या मतदारसंघातून 2014 ला निवडून आले होते. यावेळी मात्र त्यांच्यासमोर गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल उभा असेल अशी माहिती आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाकडून हार्दिक पटेलला उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जातंय. 2014 च्या निवडणुकीत मोदी या मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आले होते.

उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाने एकत्र येत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची घोषणा केली जाणार आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 37-37 जागा लढणार असल्याची माहिती आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासाठी रायबरेली आणि अमेठी मतदारसंघात सपा-बसपा उमेदवार देणार नाही. रायबरेली आणि अमेठी हे काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहेत.

सपा आणि बसपाने आरजेडीसाठीही दोन जागा सोडल्या आहेत. पण आरजेडीची आणखी जागांची मागणी आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. सपा आणि बसपा काँग्रेसला सोबत घेणार नसल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे काँग्रेसला स्वबळावरच निवडणूक लढावी लागणार आहे.

सपा-बसपा एकत्र आल्यास वाराणसीत काय फरक पडेल?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी वाराणसी आणि गुजरातमधील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्हीही ठिकाणांहून त्यांचा विजय झाला होता. वाराणसी लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 2004 सालचा अपवाद वगळता 1991 पासून या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. 2009 साली इथून भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी विजय मिळवला होता.

2014 च्या निवडणुकीत मोदींना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टक्कर दिली होती. मोदींनी त्यावेळी 581022 म्हणजेच तब्बल 56 टक्क्यांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. तर अरविंद केजरीवाल यांनी 209238 मतं मिळवली होती. इतर पक्षांच्या उमेदवाराचा सुपडासाफ झाला होता. काँग्रेसचे अजय राय यांना 75614, सपा उमेदवाराला 45 हजार, बसपा उमेदवाराला 60 हजार मतं मिळाली होती. मोदींनी जवळपास पावणे चार लाख मतांनी 2014 ला विजय मिळवला होता.

गेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी मोठ्या प्रमाणात मतांचं विभाजन केलं, ज्याचा फायदा भाजपला झाला होता. कारण, सपा आणि बसपाची मतं विभागली गेली. परिणामी काही हजारांमध्ये सपा आणि बसपाला मतं मिळाली. 2014 च्या आकडेवारीनुसार सपा आणि बसपाची मतं एक लाखांहून अधिक होतात. त्यांना काँग्रेसने साथ दिली तरी हा आकडा दीड लाखांच्या पुढे जाईल. हार्दिक पटेलला जिंकून आणण्यासाठी काँग्रेस, सपा आणि बसपा एकत्र येऊ शकतात. पण तिन्ही पक्षांची मतं मिळूनही मोदींच्या जवळ जात नाहीत. 2014 ला मोदी लाट होती. यावेळी चित्र कसं असेल त्यावर निकाल अवलंबून आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI