जनआशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्र्यांची ‘उठ-बस’, मास्क नसेल तर बुके घेणार नाही, कपिल पाटलांची ‘बदलापूर टूर’ चर्चेत

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघातील बदलापूर शहरात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी झालेली गर्दी पाहून कपिल पाटील हे कोरोना नियम पाळण्याचं आवाहन करताना दिसून आले.

जनआशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्र्यांची 'उठ-बस', मास्क नसेल तर बुके घेणार नाही, कपिल पाटलांची 'बदलापूर टूर' चर्चेत
मास्क असेल तरच बुके स्वीकारणार अशी स्तुत्य भूमिका केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी घेतली.

ठाणे :  देशासह महाराष्ट्रातही भाजपची जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirvad yatra) सुरु आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांची बदलापूरमध्ये जन आशीर्वाद यात्रा काल पार पडली. त्यांची बदलापूर टूर अनेक अर्थांनी चर्चेत राहिली, मग ती मास्कविना बुके स्वीकारणार नसल्याचा पवित्रा असो वा यात्रेदरम्यान त्यांची झालेली उठबस… बदलापूरकरांच्या आणि खुद्द कपिल पाटलांच्याही ही टूर चांगलीच लक्षात राहिल!

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघातील बदलापूर शहरात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी झालेली गर्दी पाहून कपिल पाटील हे कोरोना नियम पाळण्याचं आवाहन करताना दिसून आले.

‘मास्क असेल तरच बुके स्वीकारणार’

कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. उल्हासनगरात कोरोना कवचात दिसणारे कपिल पाटील बदलापुरात मात्र फक्त मास्क लावून फिरत होते. त्यातच त्यांच्या भोवताली स्वागत करण्यासाठी मोठा गलका झाला होता. मात्र यावेळी अनेक कार्यकर्ते फोटोसेशनसाठी मास्क काढून बुके देत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ज्याने मास्क घातला असेल त्याच्याच हातून बुके घेऊ, अशी भूमिका घेत कपिल पाटील यांनी अनेकांना मास्क घालायला लावले.

मात्र त्यांच्या स्वागतासाठी झालेल्या जीवघेण्या गर्दीतून कोरोना वाढू नये, हीच अपेक्षा व्यक्त होतेय. या यात्रेतील गर्दी प्रकरणी कल्याण डोंबिवलीत चार गुन्हे दाखल करण्यात आले असून आता अंबरनाथ आणि बदलापूर शहरातही गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जन आशीर्वाद यात्रेत राज्यमंत्र्यांची ‘उठबस’

कपिल पाटील यांची जनआशिर्वाद यात्रा काल बदलापुरातून गेली. या यात्रेत झाडांच्या व्यत्ययामुळे कपिल पाटील यांची चांगलीच ‘उठ-बस’ झाल्याचं पाहायला मिळालं. बदलापूर शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वाढून रस्त्यावर आल्या आहेत. याचाच फटका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनाही बसला.

कपिल पाटील यांच्यासह आमदार किसन कथोरे आणि अन्य स्थानिक नेते हे रथावर उभे असताना अचानक झाडांच्या फांद्या अंगावर येऊ लागल्या. त्यामुळे कपिल पाटील, किसन कथोरे यांना अनेकदा ‘उठ-बस’ करावी लागली. दुरूनच झाड दिसलं, की कपिल पाटील रथातच खाली बसायचे अन झाड गेलं की पुन्हा उभे राहायचे.

एका केंद्रीय राज्यमंत्र्यांसोबत घडत असलेला हा प्रकार पाहून बदलापूर पालिकेच्या कार्यकुशलतेची पोचपावती थेट मंत्र्यांनाच मिळाली, अशी कुजबुज यानंतर शहरात सुरू होती. बदलापूर पालिकेनं पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या खरोखरच छाटल्या होत्या का? असा प्रश्न यानंतर विचारला जातोय.

हे ही वाचा :

भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांचा शिवसेनेकडून सत्कार, सेना नेता म्हणाले, ‘ही तर बाळासाहेबांची शिकवण!’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI