नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी : कमल हसन

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:58 AM, 13 May 2019
नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी : कमल हसन

चेन्नई : अभिनय क्षेत्रातून राजकीय आखाड्यात उतरलेल्या कमल हसनने (Kamal Hassan) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तामिळनाडूतील अरावकुरीची इथं प्रचारसभेत बोलताना कमल हसन म्हणाला, “स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याचं नाव नथुराम गोडसे होतं. तेव्हापासूनच दहशतवादाला सुरुवात झाली.” कमल हसनच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुस्लिमबहुल परिसरातील प्रचारादरम्यान कमल हसनने हे वक्तव्य केलं. कमल हसन म्हणाला, “हा मुस्लिमबहुल परिसर आहे म्हणून मी हे वक्तव्य करतोय असं नाही, तर माझ्यासमोर गांधींची प्रतिमा आहे. मी याच हत्येचं उत्तर शोधण्यासाठी आलो आहे”.

सर्वांना समान वागणूक मिळेल असा भारत मला हवा आहे. मी एक चांगला भारतीय आहे, त्यामुळे माझी तर तशी इच्छा आहे, असं कमल हसनने नमूद केलं.  यापूर्वी कमल हसनने 2017 मध्येही हिंदू कट्टरवादाबाबत विधान केलं होतं. त्यावेळी वाद उफाळला होता.

भाजपची प्रतिक्रिया

दरम्यान, कमल हसनच्या या वक्तव्यानंतर भाजपनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गांधी हत्या आणि हिंदू दहशतवादाचा मुद्दा निवडणुकीत उपस्थित करणं निंदनीय आहे, असं ट्विट भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष तमिलसई यांनी केलं. अल्पसंख्यांकांची मतं मिळवण्यासाठी कमल हसन खेळी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. श्रीलंका बॉम्बस्फोटाप्रकरणी एकही प्रतिक्रिया का दिली नाही, असा सवाल तमिलसई यांनी विचारला.

कमल हसन यांचा पक्ष

कमल हसनने 21 फेब्रुवारी 2018 रोजी नव्या पक्षाची घोषणा केली. त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कोवई 2024 असं या जाहीरनाम्याला नाव देण्यात आलं आहे.  कमल हसन सातत्याने केंद्रातील भाजप सरकार आणि तामिळनाडूत एआयएडीएमकेवर निशाणा साधत आहेत.